
Shivrajyabhishek Sohala : शिवाजी महाराजांचा दुसरा भव्य राज्याभिषेक सोहळा कसा पार पडला होता? इथे जाणून घ्या
Rajyabhishek Sohla : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या थाटात साजरा करण्यात येतोय. "शिवराज्याभिषेक सोहळा" इतिहास बदलून टाकणाऱ्या महत्वाच्या घडामोडींपैकी एक होता. रायगड हा मजबूत आणि भक्कम असा किल्ला शिवरायांनी मे १६५६ साली स्वराज्यात सामील करून घेतला.
स्वराज्याची नवी राजधानी म्हणून आणि राज्याभिषेकासाठी रायगडाची निवड करण्यता आली. आज तारखेनुसार भव्य दिव्य असा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्ताने तेव्हाचा शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक सोहळा कधी आणि कसा पार पडला याचा थोडक्यात आढावा आज आपण घेऊया.
शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक सोहळा हा ६ जून १६७४ च्या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चाराच्या संस्काराने आंघोळ घालून शिवरायांच्या कुलदैवतेला स्मरून सुरु झाला. या सोहळ्यासाठी शिवरायांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते. त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा होत्या. या सोहळ्यातील दोन प्रमुख विधी होत्या, १) राजाचा अभिषेक आणि २) राजाच्या डोक्यावर छत्र धरणं.
महाराजांसाठी खास मंच तयार करण्याता आला होता. दोन फूट लांब आणि दोन फूट रुंद अशा सोन्याच्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराज बसले होते. महाराजांच्या अभिषेकासाठी विविध नद्यांचे पाणी आणण्यात आले होते. अष्टप्रधानातले आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेल्या पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. याच जलकुंभातून महाराजांवर अभिषेक करण्यात आला. यावेळी मंत्रोचारांसह वेगवेगळ्या सूरवाद्यांचे नाद गडावर गुंजत होते.
विकीपिडियावरील माहितीनुसार राज्याभिषेकावेळी गागाभट्टांना ७००० होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७००० होन दक्षिणा दिली गेली. दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गुळ, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचा ही अभिषेक करण्यात आला.
यंदाचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा कसा असणार आहे?
5 जून सकाळी 4 वाजल्यापासून महादरवाजा पूजनाला सुरुवात झाली. त्यानंतर गड पूजन, धार तलवारीची शिवकालीन युद्धकलांची मानवंदना, गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, वारकरी संप्रदायाकडून भजन किर्तनं झाली.
तर आज सहा जूनला सकाळी ७ जूनपासून रणवाद्यांच्या जयघोषात ध्वजपूजन, ध्वजारोहण, शाहिरी पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचं वाद्यांच्या गजरात आगमन, छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक, पुढे जगदीश्वराच्या दर्शनासाठी महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, जगदीश्वर दर्शन आणि महाराजांच्या समाधीला अभिवादन अशी यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची रुपरेषा असणार आहे. (Riagad)
थोडक्यात सांगायचं झाल्यास महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला महाराजांच्या काळाइतकं नाही पण हल्लीच्या महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यांनाही भव्य दिव्य असं स्वरूप प्राप्त झालंय.