
Viral Video : भाचीचं लग्न ठरलं शेवटचं! नाचताना हार्टअटॅकने व्यक्तीचा मृत्यू | Heart Attack Death
कोरोनाच्या काळानंतर हृदय विकाराने मृत्यू झालेल्यांमध्ये वाढ झाली असून २० ते ६० वयोगटातील अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एका व्यक्तीचा भाचीच्या लग्न कार्यक्रमात नाचता नाचता मृत्यू झाला आहे. ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लग्न कार्यक्रमात स्टेजवर चार ते पाचजण डान्स करत आहेत. सगळेजण आनंदात डान्स करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. महिला, पाहुणेसुद्धा यावेळी आनंदात असून स्टेजवर डान्स करत असलेल्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती अचानक थांबतो आणि खाली बसतो.
सदर व्यक्ती खाली बसल्यानंतर काही क्षणात तो जमिनीवर कोसळतो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. खाली कोसळल्यानंतर सदर व्यक्तीला उचलण्यासाठी लोकं धावले. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, १० मे रोजी ही घटना घडली असून दिलीप रौतकर असं हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते भिलाई स्टील प्लँटमध्ये अभियंता म्हणून काम करत होते. त्यांच्या भाचीचं लग्न त्यांच्यासाठी शेवटचं ठरलं असून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी शेअर केला आहे. तर यावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हृदयासंदर्भात काहीही त्रास जाणवू लागल्यास डॉक्टरांना दाखवले पाहिजे असेही सल्ले कमेंटमधून नेटकऱ्यांनी दिले आहेत.