Budget 2021 : नुसतं 'खेलो इंडिया' म्हणून कौतुक, बाकी क्रीडाक्षेत्राला गाजर

Budget 2021 : नुसतं 'खेलो इंडिया' म्हणून कौतुक, बाकी क्रीडाक्षेत्राला गाजर

टोकियोतील ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा काही महिन्यांवर आल्या आहेत. याचवेळी सादर झालेल्या अर्थसंकल्पात खेळासाठीच्या तरतुदीत वाढ अपेक्षित होती. क्रीडा स्पर्धांना पोषक वातावरण तयार करण्यास पावले उचलण्यात येतील ही अपेक्षा होती. प्रत्यक्षात याबाबत निर्मला सीतारामन यांनी निराशाच केली. 

भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलियातील मालिका विजयाचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला, पण क्रीडा क्षेत्राला कोरोनानंतरच्या परिस्थितीतून विजय मिळवण्यासाठी मदतीचा हात दिला नाही. कोरोनाच्या जागतिक साथीचा फटका क्रीडा स्पर्धांनाही बसल्याने अर्थसंकल्पातून काहीसा दिलासा अपेक्षित होता. क्रीडा स्पर्धांसाठी अतिरीक्त साह्य, क्रीडा साहित्यावरील ‘जीएसटी’मध्ये कपात, क्रीडा स्पर्धांसाठी कार्पोरेट साह्य करतील यासाठीचे उपाय असतील, ही आशा होती, पण याचा कोणताही विचारही झाला नाही, याची हळहळ क्रीडा क्षेत्राला नक्कीच आहे. 

तरतूद तुलनेने कमी 
राष्ट्रीय क्रीडा महासंघासाठी असलेली तरतूद गेल्या वर्षी ५५ कोटींनी कमी केली होती. त्यावेळी ती ३०० वरुन २४५ कोटीपर्यंत कमी झाली होती. आता ही तरतूद २८० कोटी केल्याने गेल्या वर्षापेक्षा वाढ दिसेल, पण दोन वर्षांपूर्वी केलेल्या तरतुदीच्या तुलनेत नक्कीच कमी आहे. कोरोनामुळे स्पर्धा घेण्याचे आव्हान खडतर होणार असताना हे योग्य नाही. २०१८-१९ मध्ये हीच तरतूद ३४२ कोटी होती. 

क्रीडापटूंच्या मदतीत घट 
क्रीडा महासंघाप्रमाणेच क्रीडापटूंना केल्या जाणाऱ्या मदतीत घट सुरुच आहे. क्रीडा प्रोत्साहन रक्कम २०१९-२० मध्ये ११० कोटी होती, ती २०२०-२१ मध्ये ७० कोटी झाली. ही घट कमी की काय म्हणून आता तर ही रक्कम ५३ कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची चर्चा होत असताना ही घसरण अपेक्षित नव्हती. राष्ट्रीय क्रीडा विकास निधीबाबत फार वेगळे काही घडले नाही. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी साह्य करण्यासाठी हा निधी असतो. तो २०१९-२० मध्ये ७७.१५ कोटी होता, तो २०२०-२१ मध्ये ५० कोटी झाला, आता तर तो २५ कोटींवर आणण्यात आला आहे. 

‘खेलो इंडिया’ला पाठबळ 
एकंदरीत पाहिल्यास या अर्थसंकल्पात क्रीडा महासंघाऐवजी सरकारच्या यंत्रणेवर  जास्त विश्वास दाखवण्यात आला आहे, त्यामुळे ‘खेलो इंडिया’साठीच्या तरतुदीत वाढ झाली आहे. खेलो इंडियास २०१५-१६ मध्ये शंभर कोटी दिले जात होते, तीच रक्कम दोन अर्थसंकल्पात वाढत आहे. २०१९-२० चे ५७६ कोटी २०२०-२१ मध्ये ८९०.४२ कोटी होते. मात्र आता यात आगामी आर्थिक वर्षासाठी ६५७ कोटी प्रस्तावित आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणावर सरकारची कृपा झाली आहे. २०१९-२० मधील ६१५ कोटींची तरतूद २०२०-२१ मध्ये ५०० कोटीपर्यंत कमी झाली होती, पण आता ही तरतूद ६८०.४१ कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

ठळक वैशिष्ट्ये 
- क्रीडा विभागासाठीच्या तरतूदीत जवळपास आठ टक्के घट. 
- केंद्रीय क्रीडा आणि युवा विभागासाठीची एकूण तरतूद २५९६.१४ कोटी. 
- खेलो इंडियासाठी मोठी तरतूद, पण दोन वर्षांच्या तुलनेत कमी. 
- क्रीडा महासंघाना जास्त साह्य मिळाल्याचेच माफक समाधान. 
- क्रीडा स्पर्धांसाठी पोषक वातावरण निर्मिती करण्यात अपयश. 

जमेच्या बाजू 
- खेलो इंडियासाठीची मोठी तरतूद कायम. 
- जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेसाठी असलेल्या मदतीत वाढ. 
- क्रीडा प्राधीकरणासाठी अतिरिक्त निधी. 
- जम्मू काश्‍मीर क्रीडा सुविधांसाठी ठराविक रक्कम कायम. 
- क्रीडा महासंघासाठी मदतीत माफक वाढ, पण पूर्वीपेक्षा खूपच कमी. 

त्रुटीच्या बाजू 
- कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर क्रीडा महासंघांना विशेष साह्य नाही. 
- ऑलिंपिक वर्षात क्रीडापटूंच्या प्रोत्साहन रकमेत घट. 
- राष्ट्रीय क्रीडा विकास निधीही कमी. 
- अर्थसंकल्पीय भाषणात क्रिकेट विजय सोडल्यास खेळास प्रोत्साहन देण्यासाठी कोणताही उल्लेखही नाही. 
- क्रीडा स्टेडियमच्या नूतनीकरणासाठीच्या निधीत कपात. 

बजेटच्या घोषणांमुळे काय स्वस्त, काय महाग? वाचा सविस्तर


गुण १० पैकी ४ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com