एटीएम कार्डची अदलाबदल करून ग्राहकाचे 40 हजार लंपास

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 11 एप्रिल 2018

अनोळखी चोरटा पैसे काढण्याचा बहाणा करुन बसला होता. या दरम्यान कैलास वानखेडे हे त्या केंद्रात गेले. त्यांना एटीएम कार्डद्वारे पैसे निघत नसल्याने त्यांनी बाजूलाच उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीच्या हातात कार्ड दिले.

नांदेड - एटीएम केंद्रात कार्डची अदलाबदल करून एका ग्राहकाचे 40 हजार लंपास केले. हा प्रकार वामननगर भागात सोमवारी (ता. 9) रात्री दहा वाजता घडली. 

शहरातील नंदनवन कॉलनी भागात राहणारे कैलास देवराव वानखेडे (वय 49) हे वामननगरमधील एटीएम केंद्रावर गेले. रात्री दहाच्या सुमारास या केंद्रात अगोदरच अनोळखी चोरटा पैसे काढण्याचा बहाणा करुन बसला होता. या दरम्यान कैलास वानखेडे हे त्या केंद्रात गेले. त्यांना एटीएम कार्डद्वारे पैसे निघत नसल्याने त्यांनी बाजूलाच उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीच्या हातात कार्ड दिले. परंतु त्या व्यक्तीने कार्डात अदलाबदल करुन वानखेडे यांचा पासवर्ड लक्षात ठेवून आपल्या जवळील त्याचा रंगाचे एटीएम कार्ड त्यांच्या हातात दिले. ते कार्ड घेऊन श्री. वानखेडे हे काही अंतरावर पोहोचताच त्यांच्या खात्यातून 40 हजार रुपये काढल्याचा मोबाईलवर संदेश आला. लगेच त्यांनी त्या एटीएम केंद्रावर जाऊन पाहिले तर तो चोरटा त्या ठिकाणी दिसला नाही. कार्डची तपासणी केल्या नंतर दुसरेच कार्ड हातात दिल्याचे त्यांना समजले. लगेच त्यांनी भाग्यनगर ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी एटीएम केंद्रात जाऊन सिसीटिव्ही फुटेज तपासले. त्यात चोरटा ओळखु येत नव्हता. अखेर कैलास वानखेडे यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. ढेमकेवाड हा करीत आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: By changing the ATM card someone stole 40 thousand of the customer