पिंपळगाव बाजार समितीत लाल क्रांती; दीड महिन्यात टोमॅटो विक्रीतून २२५ कोटी रुपये

एस. डी. आहिरे
Saturday, 26 September 2020

त्यामुळे बांगलादेशसह देशांतर्गत टोमॅटोच्या पुरवठ्याची सर्व भिस्त नाशिक जिल्ह्यावर आली व दराने उंच झेप घेतली. गतवर्षीच्या तुलनेत आवकेत घट आल्याने मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला. दोन दिवसांपासून टोमॅटोची दीड लाख क्रेट आवक होत आहे. 

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) यंदाच्या हंगामात दरात तेजी राहिल्याने पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोने आर्थिक लाल क्रांती केली आहे. अवघ्या दीड महिन्यात टोमॅटो उत्पादकांना विक्रीतून पिंपळगाव बाजार समितीतून शेतकऱ्यांना २२५ कोटी रुपये मिळाले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात जोखीम पत्करून लागवड केलेल्या शेतकऱ्यांना टोमॅटोला मिळालेल्या दराने उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. 

९०० रुपये क्रेटपयर्यंत टोमॅटोचा दर

द्राक्ष हंगाम ऐन भरात असताना लॉकडाउनमुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. यानंतर शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. शेतीमालाच्या पुरवठ्याची साखळी विस्कळित झाली असल्याने बाजार समित्यांत टोमॅटोची खरेदी-विक्री होणार की नाही, ही भीती मनात असताना आकर्षक दराने हंगामाचा श्रीगणेशा झाल्यानंतर टोमॅटोचा दर सरासरी ५०० रुपये प्रतिक्रेटच्या खाली आलाच नाही. कमाल ९०० रुपये क्रेटपयर्यंत टोमॅटोचा दर पोचला. त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. 

म्हणून टिकले दर

परराज्यातील टोमॅटोच्या हंगामावर अतिवृष्टीने पाणी फिरविले. गुवाहाटी, उत्तर प्रदेश, बिहार, तर महाराष्ट्रातील नारायणगाव येथील हंगाम वाया गेला. बेंगळुरू, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू येथून टोमॅटो अत्यल्प प्रमाणात बाजारात आले. त्यामुळे बांगलादेशसह देशांतर्गत टोमॅटोच्या पुरवठ्याची सर्व भिस्त नाशिक जिल्ह्यावर आली व दराने उंच झेप घेतली. गतवर्षीच्या तुलनेत आवकेत घट आल्याने मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला. दोन दिवसांपासून टोमॅटोची दीड लाख क्रेट आवक होत आहे. 

दीड महिन्यात सव्वादोनशे कोटीची उलाढाल 

पिंपळगाव बाजार समितीत गेल्या दीड महिन्यात टोमॅटोच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल झाली. ७०० रुपये प्रतिक्रेटच्या दराने दर कायम राहिले. आतापर्यंत हंगामात ४३ लाख क्रेटची आवक होऊन त्यातून शेतकऱ्यांना २२५ कोटी रुपये मिळाले. २४ सप्टेंबरपर्यंत प्रतिक्रेट ५२५ रुपये दर मिळत आहे. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

पिंपळगाव बाजार समितीत रोख पेंमेटमुळे नाशिकसह परजिल्ह्यातून टोमॅटो विक्रीसाठी येतो. पारदर्शकपणे लिलाव होत असल्याने शेतकऱ्यांची पहिली पसंत पिंपळगाव बाजार समितीला असते. - आमदार दिलीप बनकर, सभापती, बाजार समिती, पिंपळगाव बसवंत 

कोरोनाचा फैलाव होत असल्याने बाजार समितीचे कामकाज होईल की नाही, याची भीती होती. मोठे धाडस करून दोन एकर टोमॅटोची लागवड केली. दोन लाख रुपये खर्च वजाजाता १२ लाखांचे उत्पन्न चार महिन्यांत मिळाले. मोठा आर्थिक दिलासा मिळाला. - गणेश गोजरे (शेतकरी, वडगाव पंगू, ता. चांदवड) 

हेही वाचा >  भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 225 crore to farmers from sale of tomatoes in a month and a half nashik marathi news