काय सांगता! पंधरा वर्षांत ३६ सरपंच; आवर्तन पद्धतीच्या सर्रास वापरामुळे पदाची खिरापतच

sarpanch-election.jpg
sarpanch-election.jpg

नाशिक : (नामपूर) गावगाड्याच्या राजकारणात सरपंचपदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे; परंतु पाच वर्षे खुर्चीची वाट बघण्याचा कुणाकडेच संयम नसल्यामुळे ग्रामीण भागात सरपंचपदाची आवर्तन पद्धती उदयास आली. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाशी फारकत घेऊन सरपंचपदाचा काटेरी मुकुट मिळविण्यासाठी स्पर्धा निर्माण झाल्याने गेल्या पंधरा वर्षांत नामपूर ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ३६ जणांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे. 

आवर्तन पद्धतीच्या सर्रास वापरामुळे पदाची खिरापत 

सरपंचपदाचे आवर्तन ग्रामविकासला बाधक ठरत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आगामी काळात शासनाने याबाबत फेरविचार करून थेट सरपंचपदाची निवडणूक घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. राजकीय क्षेत्रात दबदबा असणारी बागलाण तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून नामपूरचा लौकिक आहे. येथील ग्रामपंचायतीची स्थापना १९३५ मध्ये झाली. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे एकच व्यक्ती सरपंच असणे, असा नामपूरसह अनेक गावांचा इतिहास आहे. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून गट-तट असल्यामुळे सरपंचपदाच्या निवडणुका अत्यंत्य चुरशीच्या झाल्या आहेत. ८० ते ९० च्या दशकात ग्रामपंचायत, तसेच सरपंचपदाच्या चुरशीच्या निवडणुकीची नागरिकांना प्रचीती आली. २००४ पर्यंत शहरात पूर्णवेळ सरपंचपदाची परंपरा होती. २००५ पासून सरपंचपदाच्या आवर्तन पद्धतीचा सर्रास वापर सुरू झाल्याने शहरात ग्रामपंचायतीत निवडून अनेकांना सरपंचपदाची खिरापत मिळाली. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांत ३६ सरपंच पाहणारी नामपूर ही विक्रमवीर नगरी ठरली आहे. 

ग्रामपंचायती मालामाल झाल्याचे आकडेवारीवरून सिद्ध

या सरपंचांना एक महिना ते एक वर्षापर्यंतचा कालावधी उपभोगायला मिळाला आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा निधी पूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना दिला जात असे. त्यामुळे या कामांना कोणते ठेकेदार नेमायाचे याचे अधिकार जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांनाच होते. त्यानंतर या कामात होणारे आर्थिक सिंचन लक्षात घेता शासनाने थेट वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचे धोरण अवलंबविल्याने सरपंचपदाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे ग्रामपंचायतींना दर वर्षी विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळू लागला. यातून गावांचा किती प्रमाणात विकास झाला हे जरी गुलदस्त्यात असले तरी ग्रामपंचायती मालामाल झाल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होते. 

राजकीय क्षेत्रात दबदबा असणाऱ्या तालुक्यातील नामपूर, लखमापूर, ब्राह्मणगाव, ताहाराबाद, उत्राणे, निताणे, कोटबेल, अंबासन, करंजाड, वाडीपिसोळ आदींसह सुमारे ४० ग्रामपंचायतींची मुदत जून, जुलै महिन्यात संपल्याने निवडणुका होणार होत्या. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय राजवट कार्यरत आहे. 

गेल्या १५ वर्षांतील सरपंच असे

जगदीश सावंत, शिवाजी सावंत, अनिल पवार, विजय सावंत, अशोक सावंत, अण्णासाहेब सावंत, युवराज दाणी, नंदू शिंदे, पुष्पा मुथा, अनुसायबाई पवार, पुष्पाबाई सावंत, संभाजी सावंत, लीलाबाई ह्याळीज, सुशीला सोनवणे, रूपेश सावंत, मालती अग्निहोत्री, संजय सोनवणे, इंदूबाई पवार, जिभाऊ मोरे, प्रमोद सावंत, मंगलाबाई सावंत, सोनाली निकम, रंजना मुथा, कविता सावंत, जयश्री सावंत, अश्पाक पठाण, किरण अहिरे, अशोक पवार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com