आजपासून लग्नांचा धूमधडाका! नवीन हंगामात ५३ लग्नतिथीसह तीस गौण मूहर्त  

प्रमोद सावंत
Friday, 27 November 2020

कोरोनामुळे मार्च ते मे दरम्यानचे लग्नसोहळे पुढे ढकलण्यात आले. यातील काहींनी जून ते ऑक्टोबरदरम्यान साध्या पद्धतीने विवाह पार पाडले. त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या विवाह सोहळ्यांची रेलचेल तुलसीविवाहानंतर सुरू होत आहे.

येवला / मालेगाव (जि.नाशिक) : तुलसीविवाह होताच या वर्षाचा लग्नांचा हंगाम शुक्रवारपासून (ता.२७) सुरू होत आहे. नवीन हंगामात नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत दाते पंचांगानुसार ५३ दिवस लग्नतिथी आहेत. गेल्या वर्षच्या तुलनेत यात दोनने वाढ झाली आहे. तसेच गौण काळातील (अस्त) तीस आणखी मूहर्त असल्याने मूर्हताची संख्येत तीस हून अधिक वाढ होणार आहे. 

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वपरं सिद्धिदं...‘
आज तुलसीचे लग्न पार पडल्याने आता यंदा राजयोग मुहुर्तांना सुरवात झाली आहे. यंदा स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वपरं सिद्धिदं...‘ मंगलाष्टकांचे हे स्वर हमखास कानी पडतील कारण अनेकांनी जोरदार लग्न करण्याची तयारी केली आहे. वऱ्हाडींना कोरोनाची काळजी घेतानाच लग्न सोहळ्यांना उपस्थित राहण्याची कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, नवीन हंगाम सुरू झाल्याने मंडप, आचारी, लॉन्स, मंगल कार्यालय, वाजंत्री, वाढपी, फूल विक्रेते, प्रिंटिंग प्रेस आदी घटकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. 

रोजीरोटीचा प्रश्‍नही मार्गी
कोरोनामुळे मार्च ते मे दरम्यानचे लग्नसोहळे पुढे ढकलण्यात आले. यातील काहींनी जून ते ऑक्टोबरदरम्यान साध्या पद्धतीने विवाह पार पाडले. त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या विवाह सोहळ्यांची रेलचेल तुलसीविवाहानंतर सुरू होत आहे. लग्नसोहळ्यांमुळे बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण होऊन आर्थिक उलाढालींना गती मिळणार आहे. याशिवाय याच व्यवसायाशी निगडित घटकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍नही मार्गी लागणार आहे. लग्न समारंभ पार पाडताना वऱ्हाडींना शासकीय नियमांचे पालन करावे लागणार आहे. कोरोना जसजसा कमी होईल तशी लग्नांमधील धूम वाढणार आहे. 
अनेक गोष्टीत लोक मुहूर्त पाहत नाही पण मुहूर्त पाहिल्याशिवाय लग्न करत नाहीत अशी स्थिती सर्वत्र असून आता लग्नसराईचे शुभ मुहूर्त आल्याने उद्यापासून लगीनघाई सुरु होऊन धामधुमीत शुभमंगल सावधान होणार आहे. 

दाते पंचांगानुसार अशा आहेत लग्नतिथी 
महिना तारीख 

नोव्हेंबर २०२० २७, ३० 
डिसेंबर २०२० ७, ८, ९, १७, १९, २३, २४, २७ 
जानेवारी २०२१ ३, ५, ६, ७, ८, ९, १० 
फेब्रुवारी २०२१ १५, १६ 
एप्रिल २०२१ २२, २४, २५, २६, २८, २९, ३० 
मे २०२१ १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ 
जून २०२१ ४, ६, १६, १९, २०, २६, २७, २८ 
जुलै २०२१ १, २, ३, १३ 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता
 
- गौण मुहूर्त 
जानेवारी १८, १९, २०, २१, २४, २५, ३० 
फेब्रुवारी १, २, ३, ४, ८, २१, २२, २६, २७, २८, 
मार्च २, ३, ५, ७, ९, १०, १५, १६, ३० 
एप्रिल १, ५, ६, ७, 
 
नवीन हंगामात ५३ लग्नतिथी आहेत. १९ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत गुरू अस्त आहे. तसेच २१ फेब्रुवारी ते १६ एप्रिल यादरम्यान शुक्र अस्त आहे. त्यामुळे या कालावधीत लग्नतिथी नाहीत. - भिकन कुलकर्णी, पुरोहित, रावळगाव 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नकार्याना सुरुवात होईल. यंदा श्री दातेशास्त्री (सोलापूर) यांनी प्रथमच धाडसी निर्णय घेत मुख्यकाल व साधे या सदरांतर्गत उपनयन आणि शुभविवाहास अधिकाधिक शुभ तिथीमुहूर्त दिले आहेत. अडचणीप्रसंगी हे शुभविवाहास जरूर वापरता येतील.” - पं.डॉ.प्रसादशास्त्री कुळकर्णी,पंचाग अभ्यासक,येवला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 53 wedding dates in season nashik marathi news