महावितरणच्या पिंपळगाव विभागात ७ कोटींची थकबाकी; थकबाकीदारांना कारवाईचा शॉक बसण्याची शक्यता

Mahavitaran
Mahavitaran

नाशिक/पिंपळगाव बसवंत : थकबाकीचा वाढता आकडा व वीजगळतीच्या वाढत्या प्रमाणामुळे येथील महावितरणची यंत्रणा हतबल झाली आहे. महवितरणच्या पिंपळगाव विभागावर शेती, घरगुती, व्यापारी व औद्योगिक अशा सुमारे २८ हजार ग्राहकांकडे सात कोटींची थकबाकी आहे. कृषीचे ग्राहक वगळता इतर थकबाकीदारांकडून वसुलीसाठी महावितरण आता ॲक्शन मोडमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे थकबाकीदारांना कारवाईचा शॉक बसण्याची शक्यता आहे. 

पिंपळगाव बसवंत विभागांतर्गत पालखेड, दावचवाडी, खेडगाव, वरखेडा, साकोरे या सहा उपविभागांमध्ये ३९ गावांचा समावेश आहे. एकूण ५४ हजार ग्राहक असून, त्यातील कृषीजोडणी वगळता २९ हजार घरगुती, व्यापारी व औद्योगिक वीज ग्राहक आहेत. महावितरणच्या वसुली पथकाने यापूर्वी अनेक योजना राबविल्या. पण प्रतिसाद न मिळाल्याने यंत्रणेची दमछाक होत आहे. पण थकबाकी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. आता तर हा आकडा सात कोटींवर पोचला आहे. 
 

कारवाईत भेदभावाचा आरोप 

महावितरणकडून वीजवसुली मोहिमा सातत्याने राबविण्यात येत आहेत. सामान्य व्यक्ती, झोपडपट्टी किंवा सामान्य वसाहतीत एक, दोन हजार रुपये थकल्यावर महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा तोडून टाकतात. पण एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक थकबाकी होईपर्यंत वीजपुरवठा का कापत नाही, असा सर्वसामान्यांना प्रश्‍न पडला आहे. प्रत्येक वीज ग्राहकांना सारखा नियम लावला जात नाही. गावपुढारी, कार्यकर्ते किंवा अन्य वजनदार व्यक्तींबाबत मात्र वीजपुरवठा खंडितऐवजी थकबाकी भरण्याचा तगादा लावला जातो. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढत आहे. हा दुटप्पीपणा सोडला, तरच थकबाकी वसुलीला मदत होणार आहे. 

वसुलीसाठी थकबाकीदार ग्राहकांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. महिनाभराचा अपवाद वगळता वीजपुरवठ्यात सुधारणा झाली आहे. नागरिकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे. 
- एकनाथ कापसे (कार्यकारी अभियंता, महावितरण, पिंपळगाव बसवंत) 

नागरिक वीजपुरवठा खंडितमुळे त्रस्त आहेत. वीजपुरवठा सुरळीत केला, तर नागरिक निश्‍चितच वीजबिल भरण्यासाठी स्वत:हून पुढे येतील. 
- संजीव देशमुख (नागरिक) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com