आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या अंतिम वर्ष परीक्षांना ९५ टक्‍के उपस्‍थिती 

अरुण मलाणी
Monday, 5 October 2020

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक म्‍हणाले, की परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मास्क परिधान केले होते. राज्यातील २७० परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या.

नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षा समाप्त झाल्या आहे. या परीक्षांना ८ सप्‍टेंबरला सुरवात झाली होती. परीक्षेत वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, समचिकीत्सा, परिचर्या, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष विज्ञान आदी विषयांचा समावेश होता. अंतीम वर्षाच्‍या परीक्षांना ९५ टक्‍के उपस्‍थिती राहिली. 

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक म्‍हणाले, की परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मास्क परिधान केले होते. राज्यातील २७० परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षा केंद्रांवर सोडिअम हायपोक्लोराईड सोल्यूशन व लिक्विड सॅनिटाईझरचा वापर झाला. विद्यापीठाकडून परीक्षेचे सीसीटीव्हि यंत्रणेद्वारे निरीक्षण करण्यात आले. प्रत्येक पेपरनंतर एका दिवसाचा खंड ठेवलेला होता. परीक्षेसाठी ९५४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज सादर केले होते. लेखी परीक्षा झाल्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षेचे विद्यापीठाकडून आयोजन केले आहे. वैद्यकीय, दंत, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष विज्ञान विद्याशाखांच्या प्रात्यक्षिक परीक्षा समाप्त झाल्या आहेत. आयुर्वेद, समचिकीत्सा, परिचर्या आदी विद्याशाखांच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

लेखी परीक्षा २६ ऑक्‍टोबर ते ९ नोव्‍हेंबर

प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहिर केले आहेत. सदरील परीक्षा विद्याशाखानिहाय दोन टप्प्यांमध्ये घेतली जाईल. वैद्यकीय विद्याशाखेच्या द्वितीय व तृतीय वर्ष, बी.पी.एम.टी. सर्व वर्ष अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा २६ ऑक्‍टोबर ते ९ नोव्‍हेंबर या कालावधीत होणार आहे. आधुनिक मध्यमस्तरीय सेवा प्रदाता विषयाची लेखी परीक्षा १९ ते २१ नोव्‍हेंबर दरम्‍यान होईल. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

दंत, आयुर्वेद, समचिकीत्सा, परिचर्या, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष विज्ञान आदी अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष पदवी विषयांच्या लेखी परीक्षा २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबरदरम्‍यान होतील. २०१९ प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिनांक ७ ते १८ डिसेंबरदरम्‍यान घेतल्‍या जातील. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून जाहिर केलेल्‍या धोरणानुसार विद्यापीठाकडून परीक्षांचे नियोजन केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 95% attendance in the final year examinations of university of health sciences nashik