पाच महिने उलटूनही आगपीडितांची फरपट सुरुच; हाती मात्र निराशाच

fire bhimvadi.jpg
fire bhimvadi.jpg

नाशिक : (जुने नाशिक) भीमवाडीतील आगीच्या तांडवात नागरिकांची घरगुती साहित्यासह महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. परिस्थिती पूर्वपदावर येत असताना पीडित कुटुंबीयांना कागदपत्रांची गरज भासत आहे. त्यासाठी त्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असून, त्यांच्या हाती निराशाच पडत आहे. प्रशासनाने एक शिबिर लावून पीडितांना कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी पीडित नागरिक करीत आहेत. 

पीडित कुटुंबीयांची चांगलीच दमछाक

गंजमाळ येथील भीमवाडी झोपडपट्टीस २५ एप्रिलला मोठी आग लागली होती. सुमारे सव्वाशे कुटुंबांचे संसार खाक झाले होते. अंगावरील कपड्यांव्यतिरिक्त त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारा जन्म-मृत्यू दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, शिधापत्रिका, घरांचे कागदपत्र अशी अनेक महत्त्वाची कागदपत्रे भस्मसात झाली होती. ती प्राप्त करण्यासाठी सध्या पीडित कुटुंबीयांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यांना शासकीय कामाचा अनुभव येत आहे. काही एजंट कागदपत्रे काढून देण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करीत आहेत; परंतु पैसे नसल्याने त्यांना ते शक्य नाही. जळालेली कागदपत्रे उपलब्ध करून दिली, तर भविष्यात अडचण भासणार नाही. यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे. 

पीडितांची आपबीती 

आगपीडित महिला तिच्या मुलीचा दाखला घेण्यासाठी महापालिका विभागीय कार्यालयात गेली होती. दाखला जुना होता. महिलेच्या मुलीची जन्मनोंद असलेल्या वर्षाचे रजिस्टर जीर्ण झाले होते. नोंदणीची माहिती सापडणे अवघड असल्याने अधिकाऱ्यांनी रजिस्टर जीर्ण आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयात करारपत्र (बॉन्ड) बनवून आणण्यास सांगितले. महिला अशिक्षित असल्याने तिला काय करावे समजले नाही. समजून सांगितल्यानंतर तिला निराश होऊन घरी परतावे लागले. बॉन्ड बनविण्यासाठी कमीत कमी पाच ते दहा हजारांची रक्कम एजंटकडून मागितली जाते. रक्कम आणायची कुठून, असा प्रश्‍न तिला पडला. 

दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी शासकीय कागदपत्रे आगीत जळाली. सध्या त्यांची गरज भासत आहे. जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेकडून नवीन कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. - नितीन कांबळे, पीडित रहिवासी 

गरीब असल्याने एजंटकडून महत्त्वाची कागदपत्रे काढून घेणे शक्य नाही. प्रशासनाने मोफत नवीन कागदपत्रे काढून देण्याची सुविधा करावी. - सुभद्रा घोडे, पीडित रहिवासी 

रहिवाशांना कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन किंवा महापालिकेने नियोजन केल्यास त्यांच्या मदतीसाठी आमची सामाजिक संघटना सदैव तत्पर राहील. - सचिन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com