पर्यटनस्थळांवर बंदी असूनही 'इथं' मनमानी सुरुच...अखेर हुल्लडबाजांना खाकीचा दणका..!

साल्हेर (ता.बागलाण) : किल्ल्यावर झालेली तरूणांची गर्दी
साल्हेर (ता.बागलाण) : किल्ल्यावर झालेली तरूणांची गर्दी

नाशिक / सटाणा : बागलाण तालुक्‍यातील शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावर पर्यटकांकडून होणाऱ्या हुल्लडबाजीमुळे साल्हेर ग्रामपंचायत प्रशासनाने किल्ल्यावर पर्यटनास अखेर बंदी घातली आहे. तर शनिवारी (ता.11) जायखेडा पोलिसांनी किल्ल्यावर गर्दी करणाऱ्या काही पर्यटकांविरोधात कारवाईही केली आहे. 

पाय घसरल्यास खोल दरी... 

अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला साल्हेर (ता.बागलाण) किल्ल्याच्या परिसरात सध्या निसर्ग खुलला आहे. मात्र हौशी पर्यटकांमुळे किल्ल्याचा परिसर कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. गेल्या 15 दिवसांपासुन साल्हेर किल्ल्यावर शासनाचे सर्व नियम पायंदळी तुडवत दररोज किमान दोन हजार तरुण-तरुणी ट्रेकिंगनिमित्ताने येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काळजी घेण्याऐवजी हे सर्व तरुण फिजीकल डिस्टन्सिंगचा भंग करीत असल्याचे सांगितले जाते. पावसामुळे किल्ल्याच्या मागील व पुढील धोकादायक दरवाजांच्या पायऱ्यांवर शेवाळं तयार झाले असुन पर्यटक स्वत:चा जीव धोक्‍यात घालून चढउतार करत आहेत. चुकुन पाय घसरल्यास 100 फुट खोल दरीत पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

अश्‍लील प्रकारांचा आरोप 

शासनाने राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांसह पर्यटनस्थळांवर बंदी घातली असतानाही गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबई, पुणे, नगर येथील हजारो तरुण-तरुणींची साल्हेर किल्ल्यावर गर्दी वाढत आहे. यामुळे प्लास्टिक बाटल्या, उरलेले खाद्यपदार्थ टाकून दिल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पुरातत्व विभागाने उभारलेल्या तटबंदीवरील धोकादायक ठिकाणी चढून तरुण सेल्फी घेतात. अनेक तरुण किल्ल्यावर मुक्कामी वास्तव्यास असल्याने किल्ल्यावरील गुहांमधे सर्रास मद्यपान आणि अश्‍लील प्रकार घडत आहेत. काही अश्‍लील वस्तु, दारुच्या बाटल्या, सिगारेट्‌सचे थोटके किल्ला परिसरात आढळून येत असल्याने किल्ल्याचे पावित्र्य धोक्‍यात आले आहे. गड अभ्यासाच्या नावाखाली साल्हेर मनोरंजन केंद्र होत आहे. पुणे - मुंबईकडून येणाऱ्या शेकडो तरुणांमुळे आदिवासी भागात कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्‍यता व्यक्त होत आहे.

पर्यायी मार्गांचा वापर 

साल्हेर किल्लावर येणाऱ्या पर्यटकांमध्ये पुणे, मुंबई, अहमदनगर, धुळे, पिंपळनेर, साक्री यांसह गुजरात राज्यातील तरुणांचा सर्वाधिक समावेश आहे. जिल्हाबंदी असल्याने पुणे - मुंबई कडील पर्यटक दिंडोरी-पुनंद-मानुरकडून तर साक्री - धुळे कडील पर्यटक प्रशासनाची नजर चुकवून मुख्य रस्त्याऐवजी चिवटीबारी मार्गे साल्हेर येथे पोहोचतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com