धान्य खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्यास कारवाई : भुजबळ 

महेंद्र महाजन
Thursday, 10 September 2020

खरीप हंगाम २०२०-२१ मधील धान, भरड धान्य खरेदीमध्ये गैरव्यवहार झाले असल्यास जबाबदारी निश्‍चित करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

नाशिक : खरीप हंगाम २०२०-२१ मधील धान, भरड धान्य खरेदीमध्ये गैरव्यवहार झाले असल्यास जबाबदारी निश्‍चित करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा सक्षम करावी
मंत्रालयात खरेदीसंबंधी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले, की धान खरेदी केंद्र सरकारच्या नियमांनुसार होत आहे, ही खात्री जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी करावी. तसेच धान खरेदीनंतर प्राप्त होणारा तांदूळ साठविण्यासाठी गुदामांची उपलब्धता निश्‍चित करावी. तांदूळ सार्वजनिक व्यवस्थेंतर्गत लाभार्थ्यांपर्यंत पोचण्याची व्यवस्था करावी. नाशिक जिल्ह्यात धान खरेदी केली जाते, मात्र तिथे मिलिंग होत नाही, याची दखल घ्यावी. पालघर, ठाणे, गडचिरोलीसाठी ‘बेस गोडाउन’चा निर्णय घ्यावा. नवीन धानाच्या भरडाईचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करावे. तसेच गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा सक्षम करावी. तांदळाची गुणवत्ता तपासणीची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घ्यावी. सचिवांच्या नियंत्रणाखाली भरारी पथक करून मिलर्स व गुदामांची तपासणी करावी. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

मिलर्सची नेमणूक करण्यासाठी नवीन अटी व शर्ती तयार करणे
आढावा बैठकीत नवीन धानच्या भरडाईबाबतचे व्यवस्थापन, गुदामांचे व्यवस्थापन, बारदान खरेदी व पुरवठा याबाबतचे व्यवस्थापन, धान भरडाई करण्यासाठी मिलर्सची नेमणूक करण्यासाठी नवीन अटी व शर्ती तयार करणे, भरडाईची प्रतवारी चांगली ठेवण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करणे, बँक गॅरंटी असणाऱ्या मिलर्सना भरडाईचे काम देणेबाबत प्रतिक्विंटल १.५ युनिट वीजवापराबाबत, राज्यातील कृषी उत्पादनाच्या आधारावर खरेदीचा अंदाज व जिल्हानिहाय गुदामांचे नियोजन करणे, धान-सीएमआर वाहतुकीबाबत, ॲडव्हान्स सीएमआरबाबत, छत्तीसगढ राज्याच्या धर्तीवर ऑनलाइन खरेदीप्रक्रिया राबविणे आदी विषयांवर या वेळी चर्चा झाली. राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, सचिव विलास पाटील, मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप हळदे, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, महसूलचे सहसचिव संतोष भोत्रे आदी उपस्थित होते.

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action in case of crime in sale of grains nashik marathi news