येवल्याच्या सहकाराला दृष्ट? नामांकित संस्था कारवाईच्या फेऱ्यात अडकल्याने चिंता 

Action on reputed organizations in the field of co-operation nashik marathi news
Action on reputed organizations in the field of co-operation nashik marathi news

नाशिक/येवला : जिल्हाभर येवल्याच्या सहकाराचा नावलौकिक आहे. दुष्काळी तालुका असूनही येथील ठेवीदार व कर्जदारांच्या विश्वासावर अनेक संस्थांनी नावलौकिक मिळवला. मात्र मागील दोन आठवड्यांत लागोपाठ तीन संस्थांवर सहकार विभागाला कारवाईची वेळ आली असून गेल्या तीन वर्षापासून येथील काही संस्थाही चौकशीच्या फेऱ्यात आहेत. त्यामुळे कोट्यावधींची उड्डाणे घेणाऱ्या येथील सहकाराला दृष्ट लागली की काय असा प्रश्न ठेवीदारांना पडू लागला आहे. 

जळगाव येथील भाईचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेने अधिक व्याजदर देऊन येथील शेकडो ग्राहकांना आकर्षित केले खरे पण अल्पावधीत संस्था डबघाईस आली. त्यामुळे चार ते पाच वर्षापासुन येथील अनेक ठेवीदारांच्या कोट्यवधीच्या रकमा आजही अडकल्या असून त्याविरोधात आंदोलनेही झाली आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोटाबंदी व थकलेल्या कर्जाच्या पैशामुळे अडचणीत आल्याने हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधीच्या ठेवी आजही बँकेत अडकून आहेत. महाआघाडीच्या कर्जमाफीमुळे बॅंकेच्या व्यवहारांना बुस्ट मिळाला असला तरी अडकलेल्या ठेवींसाठी अजूनही बँकेकडे तगादे सुरूच आहेत. येथील नामांकित पारख पतसंस्था चौकशीच्या फेऱ्यात आहे. मात्र मर्चंट्स बँकेने अफवांवर मात करून फिनिक्स भरारी घेत पूर्ववत कामकाज सुरू झाले आहे. 

तीन संस्था रडारवर... 

तीन पतसंस्थांनी मागील आठवड्यातच गाशे गुंडाळल्याने सहकार क्षेत्र पुन्हा चर्चेत आले आहे. नगरसुल येथील संत जनार्दन स्वामी पतसंस्थेत नियमबाह्य कर्जवाटप व सोनेतारणातून तब्बल एक कोटी ६८ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवला. आजही अनेकांच्या ठेवी येथे अडकल्या आहेत. यामुळे अकरा तारखेला थेट पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून संस्थेचे अध्यक्ष सतीश पैठणकर फरार आहेत. नगरसुल येथे शुक्रवारी नाशिक आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकाऱ्यांनी छापा टाकून चौकशीसाठी दप्तर ताब्यात घेतले आहे. शहरात नावारुपाला आलेल्या श्री. गुरुदेव नागरी सहकारी व धनश्री महिला पतसंस्थावर सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांनी कारवाई करत संचालक मंडळ बरखास्त करून आर.पी.जाधव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. या संस्थांनी तरतुदीचे उल्लंघन करणे, पोटनियम बाह्य कामकाज, जबाबदाऱ्या पार पाडण्यास अक्षम्य निष्काळजी, ठेवी परत न देणे, नियमबाह्य कर्जवाटप आदी बेकायदा कामांमुळे १६ जून रोजी पोलीसात संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर आता प्रशासक नेमणुकीची कारवाई झाली असून यामुळे ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


येवल्यातील संस्था.. 
राष्ट्रीयकृत संस्था – १४ 
जिल्हा बँक शाखा – १० 
सहकारी बँका – ३ 
पतसंस्था – ४२ 
पगारदार पतसंस्था – १३ 
वि.का.सोसायट्या – ८३ 
ख.वि.संघ - १ 
मजूर संघ – ८९ 
गृहनिर्माण संस्था – ३ 
औद्योगिक वसाहत – १ 
मान्यताप्राप्त सावकार – २ 
एकूण सहकारी संस्था – ३०३ 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com