रात्रीची वेळ...दोन बारकी लेकरं घेऊन 'त्या' जोडप्याचा पुणे ते येवला प्रवास...अन् अचानक समोर गाडी थांबते तेव्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

रात्री नऊ वाजता पायी चालत येथे पोहोचलेल्या एका कुटुंबाला आडवळणी मार्गावरील 30 किलोमीटर अंतरावरच्या घराकडे जाण्यासाठीचे रस्तेच जणू बंद झाले होते. सोबत दीड महिन्याचं अन दीड वर्षाचं अशी दोन बाळं आणि महिलाही असल्याने रात्री थांबावे तरी कुठं असा प्रश्न सतावत असताना अचानक...

नाशिक/येवला : रात्री नऊ वाजता पायी चालून चालून अगदी जीवच पायात आला होता...अर्ध्या रस्त्यात पोहोचलेल्या त्या कुटुंबाला आडवळणी मार्गावरील 30 किलोमीटर अंतरावरच्या घराकडे जाण्यासाठीचे रस्तेच जणू बंद झाले होते...सोबत दीड महिन्याचं अन् दीड वर्षाचं अशी दोन बाळं आणि महिलाही असल्याने रात्री थांबावे तरी कुठं असा प्रश्न सतावत असताना अचानक एक गाडी येऊन थांबली...

बाळांना खायला काय देणार? 

लॉकडाऊनमध्ये पुण्यात अडकलेले दोन कुटुंब पुण्याकडून येवल्याकडे पायी येत होते. रस्त्यात कुठेतरी येवल्यातील एका वाहनचालकांनी त्यांना बसवून आणले आणि येथील बसस्थानकावर सोडले. मात्र रात्रीचे नऊ वाजले असताना इथून पुढे वडाळी (ता. नांदगाव) या आपल्या गावी पोहोचणार कसे? अशा विवंचनेत हे कुटुंब थांबले होते. सोबत एक दीड वर्षांची मुलगी तर एक दिड महिन्याचे लहान बाळ असल्याने आपलं जाऊ द्या पण या बाळांना खायला काय देणार हाही प्रश्न सतावत होता. त्याचवेळी रोज सायंकाळी गरजूंना सेनापती तात्या टोपे भोजन थाळी वाटणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत हा निरोप पोहोचला. लागलीच सचिन खरात हा कार्यकर्ता या सहा जणांसाठी जेवण आणि बाळांसाठी दूध घेऊन तेथे पोहोचला. अडचणीच्या वेळेस दोन घास मिळणार असल्याने या कुटुंबाला खूपच आनंद झाला. या कार्यकर्त्यांनी थोडीफार विचारपूस करून तो निघूनही गेला. 

संपुर्ण संसार वस्तूंसह पोहच 

मिळालेले जेवण खाऊन बसस्थानकामध्ये रात्र काढू या विचारात असतानाच अचानक तिथे एक छोटी चार चाकी गाडी येऊन उभी राहिली. वीर सावरकर संस्थेचे अध्यक्ष आनंद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते श्रावण जावळे, श्रीकांत खंदारे, सचिन खरात हे या कुटुंबाला घरी पोहोचविण्यासाठी गाडी घेऊन बसस्थानकावर आले होते. रात्री साडेनऊच्या दरम्यान स्वतः च्या गाडीतून आनंद शिंदे व सहकारी त्यांना घेऊन राजापूरपर्यंत गेले. रात्रीची वेळ असल्याने राजापूर येथील कार्यकर्ते दत्ता सानप व माजी सरपंच प्रमोद बोडके यांच्या मदतीने त्यांनी या कुटुंबाला वडाळी येथे जाऊन त्याच्या घरापर्यंत संपुर्ण संसार वस्तूंसह पोहच केले. 

Image may contain: one or more people and people standing

हेही वाचा > महत्वाची बातमी! जूनमध्ये होणारी सेट परीक्षा पुढे ढकलली...

Image may contain: 2 people

अन आनंदाश्रू तरळले ! 

शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनीही त्यांना प्रवासासाठी सहकार्य केले. आगीतून उठून फुफाट्यात पडावे अशी गत या कुटुंबाची झाली होती. मात्र येवल्यातील या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अर्ध्या रात्री आपल्या बाळांसह कुटुंब घरी पोहोचले आणि त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून या मदती प्रति आभार व्यक्त करताना अश्रू तरळले. त्यांना सोडून अखेर पुन्हा हे कार्यकर्ते रात्री बारा वाजता येवल्यात परतले. एका कुटुंबाला आधार दिल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

हेही वाचा > BIG BREAKING : एमएचटी-सीईटीच्या तारखा जाहीर; सत्रनिहाय होणार परिक्षा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Activists in Yeola dropped home the homeless family trapped in the lockdown nashik marathi news