photos : सप्तश्रृंगीगडावर आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवास सुरवात; मात्र भाविकांविना मंदिर सुने सुने

योगेश सोनवणे
Saturday, 17 October 2020

कोरोनाच्या आपत्तीमुळे सप्तश्रृंगगडावर चैत्रोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सव देखील भाविकांविना अगदी साध्या पध्दतीने सुरू झाला. भाविकांविना मंदिर व सप्तश्रृंगगड परिसर घटस्थापनेच्या दिवशी अक्षरश: सुने पडल्याचे गडवासीयांनी अनुभवले. 

नाशिक : (दहीवड) साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तश्रृंगीगडावर शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. यात पहाटे पासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व  देवीच्या अलंकारांची पूजा करत साधेपणाने मिरवणूक काढण्यात आली. कोरोनाच्या आपत्तीमुळे सप्तश्रृंगगडावर चैत्रोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सव देखील भाविकांविना अगदी साध्या पध्दतीने सुरू झाला. भाविकांविना मंदिर व सप्तश्रृंगगड परिसर घटस्थापनेच्या दिवशी अक्षरश: सुने पडल्याचे गडवासीयांनी अनुभवले.  

पारंपारिक पद्धतीने देवीची पंचामृत महापूजा

सप्तश्रृंगगडावर सालाबादप्रमाणे साजरा होणारा देवीचा नवरात्रोत्सव कोरोना संसर्ग महामारीच्या पार्श्‍वभूमीवर रद्द झाला. पहिल्याच माळेला साधरणात: ५० ते ६० हजार भाविक देवी दर्शनापासून वंचित राहिले. नवरात्र उत्सवासाची परंपरा खंडित झाली. भाविकांच्या आवाजाने दुमदुमून जाणारा मंदिर परिसर व सर्व गावांत परिसरातील भक्तिमय सोहळा, लांबलचक दर्शन रांग, पोलिसांनी बंदोबस्तासाठी लावलेला फोजफाटा या सर्व वातावरणातील नवरात्रोत्सव सोहळ्याला मुकल्यामुळे भाविक भक्तांच्या मनातील हुरहूर होती. मंदिरात जाता येत नसल्याची नाराजी अनेकांच्या चेहऱ्यावर होती. परंतु कोरोना प्रकोपाने सर्वत्र हतबलता दिसून आली. साध्या पद्धतीने व शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करून सोशल डिस्टंसिंगचे पालन करून पुरोहित वर्गाच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने देवीची पंचामृत महापूजा करण्यात आली. 

देवीच्या प्रतिमेची पूजा-अर्चा करत देवीची आराधना

तत्पुर्वी सकाळी ६ वाजता ट्रस्टच्या मुख्यकार्यालयात देवीच्या आभूषणांची पूजा करण्यात आली. तसेच पुरोहितांचा वर्णी दक्षिणाचा कार्यक्रम पार पडला. दिवसभरातील कार्यक्रम सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत पार पाडण्यात आले. आदल्या दिवशीच मंदिराच्या सर्व प्रवेश मार्गावर बॅरिकेटिंग करण्यात आले होते. त्यामुळे सर्व गावकर्‍यांनी व भाविकांनी आपापल्या घरात देवीच्या प्रतिमेची पूजा-अर्चा करत देवीची आराधना केली. दरवर्षी घटस्थापनेला भाविकभक्तांच्या गर्दीचे लोंढे, ठिकठिकाणी वाटप होणारी साबुदाणा खिचडी, केळी, चहा वाटप हे अनुभवायला मिळाले नाही.

आज भगवतीला परिधान करण्यात आलेले आभूषणे

सोन्याचा मुगुट, मंगळसूत्र, गुलाबहार, कुयरीहार, कमरपट्टा, सोन्याचे तोडे, नथ, सोन्याची कर्णफुले, चांदीच्या पादुका

घरबसल्या देवीचे ऑनलाईन दर्शन

https://youtu.be/hEdDEi_izEA या संकेतस्थळावर जाऊन भाविकांना घरबसल्या देवीचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे तसेच http://www.saptashrungi.net/donation.php भाविकांना ऑनलाईन देणगी ट्रस्ट या संकेतस्थळावर जाऊन देणगी देता येणार आहे.  

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, प्रसादालय विभागप्रमुख प्रकाश जोशी, पुरोहित संघाचे अध्यक्ष धनंजय दीक्षित, विनोद दीक्षित, घनश्याम दीक्षित, उपाध्यक्ष भूषण देशमुख, मिलिंद दीक्षित, गौरव देशमुख आदींसह पुरोहित वृंद उपस्थित होते.

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adishaktis Navratri festival begins at Wani nashik marathi news