
कुक थांबले, कामगार गावाकडे..! हॉटेल व्यावसायिकांची व्यथा; परप्रांतीय कामगार परतू लागले
नाशिक : ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर कारखाने, ज्वेलरी, हॉटेल, तसेच बांधकाम साईटसवर काम करणारे कामगार गावाकडे परतू लागल्याने किमान महिनाभरासाठी अर्थचक्र मंदावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरापासून सर्वाधिक आर्थिक फटका बसलेल्या हॉटेल व्यवसायिकांना फुड पार्सल देता येणार असले तरी कामगार सांभाळणे अवघड असल्याने सुटी देण्यात आली आहे.
शहरात छोटी-मोठी साडे पाचशेहून अधिक हॉटेल्स आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे तब्बल वर्षभर हॉटेल बंद राहिली. डिसेंबर अखेरीस हॉटेल सुरू झाले असले तरी पूर्ण क्षमतेने सुरू नव्हती. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही संचारबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आल्याने हॉटेल व्यवसाय ताकदीने उभे राहण्यास किती कालावधी लागेल, याची शाश्वती नाही. संचारबंदीत फुड पार्सल उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आल्याने हॉटेलमधील कुक स्थीरावणार आहे, परंतु हॉटेलमधील कामगाराचे वेतन आता देणे शक्य नसल्याने अशांना कामाला सुट्टी द्यावी लागत असल्याचे चित्र आहे. ज्वेलरी व्यवसायात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. विशेषत: पश्चिम बंगालमधील कामगार दागिने घडणावळीचे कामे करतात. दुकाने बंद राहणार असल्याने व सोने मागणी घटल्याने कामगारांना सुटी द्यावी लागली आहे.
बांधकाम व्यवसायावर परिणाम
बांधकामांच्या साईटसवर मजुरांची राहण्याची व्यवस्था केल्यास त्या साईटस सुरू ठेवता येणार आहे. मात्र, कोरोना संसर्गाची परिस्थिती सर्वत्र सारखी असल्याने त्यात महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्याने परप्रांतिय कामगारांनी घरचा रस्ता धरला आहे. ज्या बांधकामांच्या साईटसवर मटेरियल्स येऊन पडले आहे, त्या कामात जेवढे भागेल तेवढेच काम होणार आहे. सिमेंट, रेतीचा साठा आठ दिवसांपेक्षा अधिक काळ करू शकत नसल्याने फार तर आठ दिवस शहरातील साईटस सुरु राहतील. त्यानंतर आपोआप साईटस बंद होणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
Web Title: After Announcement Curfew Workers Have Started Returning
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..