Marathi Sahitya Sammelan : बोधचिन्हासाठी लागेना मुहूर्त! संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष ठरले तरीही ‘तारीख पे तारीख’ 

sammelan logo 1.jpg
sammelan logo 1.jpg

नाशिक : येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आणि साहित्यातील ‘नाट्य’चा पडदा उघडला गेलाय. सारस्वत असो की मायमराठी रसिक असो यामुळे नव्हे, तर जो भेटेल अन्‌ जसे सुचेल, तशी माहिती देण्याच्या ‘कार्यक्रमा’मुळे संमेलन रंगतदार ठरणार याची कुणकूण एव्हाना नाशिककरांना लागलीय. त्याचीच चुणूक संमेलनाच्या बोधचिन्हासाठी न लागलेल्या मुहूर्तातून पाहायला मिळतेय. 

संमेलनाच्या बोधचिन्हासाठी लागेना मुहूर्त 
संमेलनाध्यक्ष कोण? यावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी संमेलनाध्यक्षपदी खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची बहुमताने निवड केल्याचे जाहीर करुरून पडदा टाकला. त्यास चोवीस तासांचा कालावधी होत नाही, तोच यजमानांनी स्वागताध्यक्ष पदासाठी पालकमंत्री छगन भुजबळांच्या नावाची घोषणा केली. हे कमी की काय पण, संमेलनाच्या कार्यालयाच्या उद्‌घाटनाची औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे. पण, साहित्याचे ‘नाट्य’ संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. संमेलनाच्या बोधचिन्हासाठी ‘तारीख पे तारीख’ दिली जातेय. साहित्यातील ‘नाट्य’ एवढ्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. 

संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष ठरले तरीही ‘तारीख पे तारीख’
साहित्य संमेलनाचा मान नाशिकला मिळतोय म्हटल्यावर बोधचिन्हासाठी स्पर्धा घेण्यात आली. त्यात राज्यभरातून साठहून अधिक बोधचिन्ह प्राप्त झाल्याची वंदता आहे. संमेलनाच्या रूपाने ‘छबी’ प्रतिबिंबित करू इच्छिणाऱ्यांनी स्थानिक कलावंतांनासुद्धा बोधचिन्ह साकारण्यास सांगितले असल्याचे नाशिककरांपासून दडून राहिलेले नाही. त्यामुळे कदाचित, बोधचिन्ह किती प्राप्त झालेत, हे रसिकांपर्यंत पोचवण्याची तसदी घेतली गेलेली दिसत नाही. हे कमी की काय, म्हणून संमेलनाचे निमंत्रण देत असताना २२ जानेवारीला बोधचिन्हाच्या अनावरणाचे निमंत्रण दिले गेले. पण, त्याही मुहूर्ताला बोधचिन्ह नाशिककरांप्रमाणे सारस्वत आणि रसिकांपुढे आलेले नाही. त्यामुळे बोधचिन्ह अनावरणाचे निमंत्रण दिलेल्यांना मुहूर्त पुढे गेलाय, हे सांगण्याची तसदी गेली की नाही हेही गुलदस्त्यात आहे. संमेलनाच्या तयारीचा एक हिस्सा होऊ पाहणाऱ्या लेखकांना बोधचिन्ह निवड प्रक्रियेत सहभागी होण्याचा निरोप धाडण्यात आला होता. त्यांनाही बोधचिन्ह निवडीचे पुढे काय झाले? हे कितपत समजले असावे हाही एक प्रश्‍नच आहे म्हणा! 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच
यजमानांना आपल्या संस्थेचा विसर 
संमेलनाच्या तयारीच्या अनुषंगाने काही ठिकाणी छोटेखानी फलक झळकल्याचे चित्र पाहायला मिळाले खरे. पण, त्यावर यजमान संस्थेच्या उल्लेखाचा विसर यजमानांना का पडला असावा, अशी खदखद संमेलनाच्या तयारीत सक्रीय झालेल्या यजमान संस्थेतील अनेकांमध्ये आहे. बरं हे प्रकरण नामोल्लेखापर्यंत सीमित राहिलेले नाही. संमेलन मायमराठीचा उत्सव असताना किमान शुद्धलेखनाची काळजी घ्यायला हवी की नको? त्याकडे ढुंकून पाहिले जात नाही, असे धगधगते वास्तव नाशिककरांच्या नजरेआड होत नाही. 

नाशिककरांना पडलेले प्रश्‍न 
० संमेलनासाठी किती बोधचिन्ह प्राप्त झालेत आणि त्याची माहिती कधी होणार जाहीर 
० स्पर्धेत प्राप्त झालेल्या बोधचिन्हांच्या व्यतिरिक्त बोधचिन्हांचा विचार होणार काय? 
० बोधचिन्ह ‘इव्हेन्ट मॅनेजमेंट'साठी पूरक ठरण्यासाठी विचारात घेतली गेल्यास स्पर्धकांना अन्याय होणार नाही काय?  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com