कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्यांचीच होतेय अडवणूक...वाचा नेमके काय घडले?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच जिल्हाबंदी असताना प्राधिकृत अधिकाऱ्याची परवानगी न घेता उपचार घेत असलेल्या नऊ रुग्णांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. हे आदेश सर्वथा गैर असून याउलट महापालिका प्रशासनाने हे रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे.

नाशिक : (मालेगाव) शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असताना महापालिका प्रशासनाने रुग्णांच्या सेवेसाठी जीवन, फरहान व सहारा हे खासगी हॉस्पिटल्स अधिग्रहीत करून त्यात कोविड सेंटर व आयसोलेशन वॉर्ड सुरू केले. येथील कोरोनाबाधितांवर उपचार, सेवा करीत शेकडो रुग्णांना कोरोनामुक्त करणाऱ्या डॉक्टर तसेच कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने काम करणारे मानधनावरील डॉक्टर, वॉर्डबॉय, नर्स, सफाई कामगार यांचीच महापालिका प्रशासनाने अडवणूक सुरू केली आहे. 

तीन महिन्यांपासून मानधन दिले नसल्याचा आरोप

डॉक्टरांना कारणे दाखवा व बाहेरील रुग्णांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन त्रस्त केले जात आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून मानधन दिले नसल्याचा आरोप करत संसर्ग काळात उल्लेखनीय सेवा करणाऱ्यांना जाणूनबुजून दिला जाणारा त्रास निषेधार्ह असल्याचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, महागटबंधन आघाडीचे नगरसेवक मुश्‍तकीम डिग्निटी यांनी शनिवारी (ता.१८) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. येथील महेशनगर भागात पत्रकार परिषद झाली. आमदार मौलाना मुफ्ती व श्री. डिग्निटी म्हणाले, की फरहान येथील कोविड केंद्राचे व्यवस्थापक डॉ. परवेज फैजी यांना त्यांनी उपचार करून कोरोनामुक्त केलेल्या रुग्णांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. मुळातच अत्यवस्थ स्थितीत आलेल्या रुग्णाला मग तो कुठलाही असो दाखल करून त्याच्यावर उपचार करणे हे डॉक्टरांचे कर्तव्य असते. 

अन्यथा आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा

रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच जिल्हाबंदी असताना प्राधिकृत अधिकाऱ्याची परवानगी न घेता उपचार घेत असलेल्या नऊ रुग्णांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. हे आदेश सर्वथा गैर असून याउलट महापालिका प्रशासनाने हे रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे. एकूणच प्रशासनाची भूमिका दुटप्पी आहे. डॉक्टरांना दिलेला आदेश मागे घ्यावा, कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या मानधनावरील डॉक्टर, कंत्राटी कर्मचारी असलेले वॉर्डबॉय, नर्सेस, सफाई कामगारांचे मानधन तीन महिन्यांपासून प्रलंबित आहे. मानधन आठ दिवसांत अदा करावे; अन्यथा महागटबंधन आघाडीचे नगरसेवक व आघाडी आंदोलनाची भूमिका घेतील, असा इशारा दिला. या वेळी नगरसेवक एजाज बेग, मन्सूर अहमद, प्रा. रिजवान खान, अबुलैस अन्सारी आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा > थरारक! बायकोच्या चारित्र्यावर होता नवऱ्याला संशय...मध्यरात्रीच केला 'असा' अंगावर काटा आणणारा प्रकार

रुग्णांवरच गुन्हा कसा नोंदवायचा? असा प्रश्‍न 

शहरातील पवारवाडी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील फरहान हॉस्पिटलमध्ये संगमेश्‍वर तालुक्यातील चार, धुळे येथील दोन, नाशिक, येवला, चंदनपुरी व जळकू येथील प्रत्येकी एक अशा एकूण दहा रुग्णांनी महापालिका क्षेत्राबाहेरील असताना उपचार घेतले. हे रुग्ण बाहेरगावचे असताना परवानगी न घेता शहरात दाखल झाले. यासाठी महापालिकेने प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक करून संबंधित रुग्णांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे पत्र पवारवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी आयुक्तांना पाठविले. या पत्राच्या संदर्भानुसार आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून डॉ. परवेज फैजी यांची नियुक्ती केली. या आदेशामुळे फैजी यांची अडचण झाली. उपचार केलेल्या रुग्णांवरच गुन्हा कसा दाखल करणार, असा प्रश्‍न त्यांना भेडसावत आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! धरणात पोहण्यासाठी गेलेल्या पोलीसासह दोन मित्रांचा बुडून मृत्यू...परिसरात खळबळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allegations against the corporation administration for obstructing the treatment of corona sufferers nashik marathi news