शेतकऱ्यांना मोठा दिलासा : यंदा २,२७१ कोटी खरीप पीक कर्ज वाटपाचा टप्पा पार!

विक्रांत मते
Thursday, 1 October 2020

काही खासगी बँकांनी दुर्लक्ष केल्याचे लक्षात आल्यानंतर थेट बँकांच्या वरिष्ठांशी पत्रव्यवहार करीत स्थानिकांच्या कामकाजात सुधारणा करण्याचे सुचविले. जिल्हा बँकेला वेळोवेळी पत्रव्यवहार करीत, उद्दिष्टवाढीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्यवस्थापकांशी नियमित बैठका घेत आव्हानात्मक परिस्थितीत खरीप पीक कर्जाचे वितरण झाले.

नाशिक : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात तब्बल दोन हजार २७१ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून, गत वर्षीच्या तुलनेत ६५८ कोटी रुपये अधिक पीककर्ज वाटण्यात आले. कोरोनामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना या कर्जपुरवठ्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढाकार घेऊन तब्बल दीड महिन्यापासून विविध प्रयत्न केल्याने यंदा अनेक वर्षांनंतर प्रथमच दोन हजार २७१ कोटी रुपयांचा टप्पा पार झाला आहे. 

आव्हानात्मक परिस्थितीत खरीप पीक कर्जाचे वितरण

'सकाळ'ने पीक कर्जाच्या विषयाकडे लक्ष वेधले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून दीड महिन्यापासून नियोजनपूर्वक लक्ष घातले. तालुकास्तरावर बैठका घेण्याचे निर्देश देत प्रत्येक आठवड्याला आढावा घेतला. अशाही स्थितीत काही खासगी बँकांनी दुर्लक्ष केल्याचे लक्षात आल्यानंतर थेट बँकांच्या वरिष्ठांशी पत्रव्यवहार करीत स्थानिकांच्या कामकाजात सुधारणा करण्याचे सुचविले. जिल्हा बँकेला वेळोवेळी पत्रव्यवहार करीत, उद्दिष्टवाढीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्यवस्थापकांशी नियमित बैठका घेत आव्हानात्मक परिस्थितीत खरीप पीक कर्जाचे वितरण झाले. 

जिल्हा बँकेची २२१ कोटींपर्यंत मजल 

पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांनी पीक कर्ज वितरणासाठी आढावा घेतला. जिल्हाधिकारी स्वतः दर आठवड्याला बैठक घेत असल्याने या संपूर्ण कामात सातत्य राहिले. जिल्हा बँकेने आपले उद्दिष्टापेक्षाही जास्त कर्ज वितरण केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, यूबीआय बँकांनी खूप लक्ष केंद्रित केले होते. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये सुरवातीला खूप मागे असलेल्या जिल्हा बँकेने २२१ कोटींपर्यंत मजल मारली. 

१७ टक्के अधिक कर्ज 

खरीप पीक कर्ज वितरणाचे गेल्या वर्षी तीन हजार १४७ कोटी उद्दिष्ट होते आणि कर्ज वाटप एक हजार ६२३ कोटी इतके झाले होते. या वर्षी ती हजार ३०० एवढे उद्दिष्ट असून, कर्ज वितरण दोन हजार २७१ कोटी इतके झाले आहे. वाढीव उद्दिष्ट असून व परिस्थिती प्रतिकूल असूनही गेल्या वर्षीपेक्षा १७ टक्के अधिक कर्ज वितरण झाले आहे. या कर्ज वितरणात एनडीसीसी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने चांगल्या प्रकारे कर्ज वितरण केले आहे. तर एनडीसीसी, बँक ऑफ इंडिया व युनाटेड बँक ऑफ इंडियाने आपल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वितरण केले आहे. 

हेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

खरिपाप्रमाणेच रब्बी पीक कर्ज वितरणाची रचना करण्यात येणार आहे. खरिपाच्या अनुषंगाने कर्ज वितरणाची रचना तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रब्बीच्या हंगामातही कर्ज वितरण चांगले राहील. राज्यातही पहिल्या चार-पाच जिल्ह्यांत नाशिकचा समावेश आहे. - सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक) 

आर्थिक वर्ष उद्दिष्ट (कोटी) वितरण (कोटी) टक्के 

२०१९ ३,१४७ १,६२३ ५१.५८ 
२०२० ३,३०३ २,२७१ ६८.७४ 

बँका उद्दिष्ट वितरण टक्के 

एनडीसीसी ४३७ ४४३ १०१ 
महाराष्ट्र बँक ५१० ३८७ ७५ 
स्टेट बँक ४८६ ३७३ ७६ 
बँक ऑफ इंडिया ११५ १०३ ९० 
युनियन बँक १५५ १३९ ८९  

हेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allocation of kharif crop loan of Rs 2,271 crore this year nashik marathi news