नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये ‘अमेरिकन पाहुणा’ दाखल; पहिल्यांदाच दोन सत्रांत झाली पक्षीगणना, पाहा PHOTOS

आनंद बोरा 
Wednesday, 2 December 2020

पक्षीतीर्थ नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात ‘अमेरिकन पाहुणा’ ऑस्प्रेचे दर्शन घडले. अभयारण्यात पहिल्यांदाच दोन सत्रांमध्ये पक्षीगणना करण्यात आली. त्यामध्ये गवताळ पक्ष्यांचा किलबिलाट मोठा असल्याचे आढळले आहे. निफाड तालुक्यात गारठा अधिक असतो. मात्र, यंदा डिसेंबर सुरू झाला तरीही पारा अधिकाअधिक घसरलेला नाही. त्यामुळे पानपक्ष्यांची संख्या कमी असल्याचे चित्र पक्षीगणनेत दिसून आले. 

नाशिक : पक्षीतीर्थ नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात ‘अमेरिकन पाहुणा’ ऑस्प्रेचे दर्शन घडले. अभयारण्यात पहिल्यांदाच दोन सत्रांमध्ये पक्षीगणना करण्यात आली. त्यामध्ये गवताळ पक्ष्यांचा किलबिलाट मोठा असल्याचे आढळले आहे. निफाड तालुक्यात गारठा अधिक असतो. मात्र, यंदा डिसेंबर सुरू झाला तरीही पारा अधिकाअधिक घसरलेला नाही. त्यामुळे पानपक्ष्यांची संख्या कमी असल्याचे चित्र पक्षीगणनेत दिसून आले. 

गोदावरी व कडवा नद्यांच्या संगमावर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे विशाल जलाशय तयार झालाय. इथे गाळ साचून वनस्पतींची वाढ झाल्याने पक्ष्यांसाठी उत्कृष्ट अधिवास तयार झाला आहे. अशी पाणथळ जागा पक्ष्यांना आकर्षित करते. अभयारण्यात २६५ पक्षी प्रजातींची नोंद केली गेली आहे. सोमवारी (ता. ३०) सकाळी सात ते दहा आणि दुपारी चार ते सात अशा दोन सत्रांत पक्षी गणना झाली. अनेक पक्षी सकाळी दिसतात, तर काही पक्षी दुपारनंतर दिसतात. त्यामुळे दोन सत्रांत पक्षीगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपार सत्रातील पक्षी गणनेत कॉमन क्रेनची संख्या तीनशेच्या आसपास आढळली. 

सात हजार पक्ष्यांची नोंद 

पक्षी गणनेमध्ये सात हजारांच्या आसपास पक्षी दिसून आले. यंदा धरणात पाणीसाठा मोठा असल्याने गाळपेऱ्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक पक्षी आले नसल्याचे पक्षीमित्रांचे निरीक्षण आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. ते आता खुले करण्यात आले आहे. तापमान आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासून मास्क लावल्यावर अभयारण्यात प्रवेश दिला जातो.

 

Image may contain: bird and outdoor

अमेरिकेतून स्थलांतर करून आलेला ऑस्प्रे मासे पकडून खाताना पक्षीगणनेवेळी आढळून आला आहे. पक्षीगणनेत कॉमन क्रेन, खाटिक, वेडाराघू, मुनिया, वारकरी, जाकाना, ग्रे हेरॉन, कापशी घार, मार्श हेरिअर, पेंटेड स्टोर्क, गडवाल, हळदी-कुंकू, थापट्या, धनेश, किंगफिशर आदींचा किलबिलाट वाढल्याचे आढळले. प्रभारी पक्षी वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काळे, पक्षीमित्र अनिल माळी, अनंत सरोदे, एन. आर. तांबे, डी. कडाळे, गंगाधर अघाव, डी. डी. फापाळे, सुनील जाधव, प्रमोद मोगल, एकनाथ साळवे, संजीव गायकवाड, गाइड अमोल दराडे, अमोल डोंगरे, शंकर लोखंडे, पंकज चव्हाण, रोषण पोटे, रमेश दराडे, विकास गारे आदी सहभागी झाले होते. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

 

लॉकडाउनमध्ये अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश देण्यात येत नव्हता. आता प्रवेश खुला करण्यात आल्याने पर्यटक यायला सुरवात झाली आहे. थंडी नसल्याने पक्ष्यांची संख्या थोडी कमी आहे. 
-अशोक काळे, प्रभारी, वनपरिक्षेत्र अधिकारी 

 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: American bird Osprey was spotted at Nandur Madhyameshwar Bird Sanctuary nashik marathi news