वादग्रस्त वृक्षगणना प्रस्ताव मंजुरीचे प्रयत्न; नगरसेवकांच्या हस्तक्षेपाने संशयाचे ढग

विक्रांत मते
Wednesday, 4 November 2020

प्रारंभी शहरात पंचवीस लाख वृक्ष असतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यापेक्षा अधिक वृक्ष असल्याचा दावा करताना तब्बल ४९ लाख वृक्षांची गणना करण्यात आली. यापूर्वी २.१३ कोटींची निविदा होती.

नाशिक : वाढीव वृक्षगणनेचा प्रस्ताव महासभेने फेटाळल्यानंतर पुन्हा नव्याने या प्रस्तावाला मागच्या दाराने मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यात काही नगरसेवकांचा वाढता हस्तक्षेप संशयाला कारणीभूत ठरत आहे. महासभेत पुन्हा प्रस्ताव ठेवल्यास गाजावाजा होईल, या भीतीने वृक्ष प्राधिकरण समितीच्या माध्यमातून एक कोटी ९० लाखांचा प्रस्ताव मंजुरीचा घाट घातला जात आहे. 

देयकांसाठी प्रस्ताव सादर

उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शहरात वृक्षसंपदेची गणना करण्याचा निर्णय २०१५ मध्ये घेण्यात आला होता. प्रारंभी शहरात पंचवीस लाख वृक्ष असतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यापेक्षा अधिक वृक्ष असल्याचा दावा करताना तब्बल ४९ लाख वृक्षांची गणना करण्यात आली. यापूर्वी २.१३ कोटींची निविदा होती. त्यापैकी दोन कोटी तीन लाख रुपये वृक्षगणना करणाऱ्या कंपनीला अदा करण्यात आले. त्यानंतर महासभा किंवा स्थायी समितीची परवानगी न घेता वाढीव वृक्षगणनेला प्रशासनाने मंजुरी दिली. त्याचे एक कोटी ९० लाखांचे देयकांसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. 

कायदेशीर अडचण निर्माण होण्याची खात्री

महासभेवर दोनदा प्रस्ताव सादर झाला. परंतु शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसन या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. वास्तविक, वादग्रस्त प्रस्ताव असल्याने एक तर त्याची चौकशी करणे किंवा सदरचा प्रस्तावच तहकूब करणे अपेक्षित असताना तहकूब ठेवताना कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विधी विभागानेही स्पष्ट सल्ला देण्याची गरज होती. तसे झाले नाही. प्रशासकीय पातळीवर या विषयासंदर्भात कायदेशीर अडचण निर्माण होण्याची खात्री असल्याने विषय बाजूला सारण्यात आला. 

नगरसेवकांची धडपड 

महासभेने दोनदा विषय तहकूब केल्यानंतर आता एक कोटी ९० लाखांची देयके काढून देण्यासाठी भाजपचे काही नगरसेवक सरसावले आहेत. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील एका मोठ्या नेत्याचा हवाला देत विषय मंजुरीसाठी उद्यान विभागावर दबाव आणला जात आहे. विषय मंजुरीसाठी पुढच्या दाराने म्हणजेच महासभेचे दारे जवळपास बंद झाले असताना मागच्या दाराने हा विषय मंजूर करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. वृक्षप्राधिकरण समितीची १९ सप्टेंबरला बैठक झाली. त्या बैठकीच्या जादा विषयपत्रिकेत मंजुरी दाखवून बिले काढण्याचा घाट घातला जात आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

वृक्षगणनेसंदर्भात अनेक तक्रारी असून, त्याची शहानिशा झाल्याशिवाय विषय मंजूर करणार नाही. - चंद्रकात खाडे, सदस्य वृक्षप्राधिकरण 

मागील सभेत वृक्षगणनेचा विषय नव्हता. नियमानुसार समितीवर विषय आला पाहिजे. मागच्या दाराने आम्ही विषय मंजूर होऊ देणार नाही. - अजिंक्य साने, सदस्य, वृक्षप्राधिकरण समिती  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to approve controversial tree census proposal nashik marathi news