ग्रामीण रुग्णालयाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न! माजी आमदारांनी बनकरांवर डागली तोफ

दीपक अहिरे | Sunday, 13 September 2020

आमदार दिलीप बनकर यांनी पिंपळगाव येथील प्रगतिपथावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात ५० खाटांचे ऑक्सिजन व्हेंटिलेटर कोविड सेंटर व ग्रामीण रुग्णालयाचे उद्‍घाटन केले. त्यानंतर माजी आमदार कदम यांनी शनिवारी (ता. १२) ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची पाहणी करून पत्रकारांशी संवाद साधत आमदार बनकर यांनी ग्रामीण रुग्णालयाचे उद्‍घाटन व श्रेय घेण्याचा प्रयत्नावर सडकून टीका केली.

नाशिक/पिंपळगाव बसवंत : वर्षभराच्या कारकीर्दीत साधे शौचालय उभारू न शकलेले विद्यमान आमदारांनी ग्रामीण रुग्णालयाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. कारण, मी दहा वर्ष पाठपुरावा केलेल्या पिंपळगावच्या सुसज्ज रुग्णालयाचे उद्‍घाटन करणे म्हणजे कोरोनाच्या तव्यावर पोळी भाजण्याचा प्रयत्न विद्यामान आमदार करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन झाल्याचे सर्वश्रुत असताना बनकर यांनी प्रसिद्धीसाठी हा खटाटोप केल्याची टीका माजी आमदार अनिल कदम यांनी आमदार बनकर यांच्यावर केली.

श्रेय घेण्याचा प्रयत्नावर सडकून टीका

आमदार दिलीप बनकर यांनी पिंपळगाव येथील प्रगतिपथावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात ५० खाटांचे ऑक्सिजन व्हेंटिलेटर कोविड सेंटर व ग्रामीण रुग्णालयाचे उद्‍घाटन केले. त्यानंतर माजी आमदार कदम यांनी शनिवारी (ता. १२) ग्रामीण रुग्णालयाच्या कामाची पाहणी करून पत्रकारांशी संवाद साधत आमदार बनकर यांनी ग्रामीण रुग्णालयाचे उद्‍घाटन व श्रेय घेण्याचा प्रयत्नावर सडकून टीका केली. कोरोनाच्या नावाखाली श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ग्रामीण रुग्णालयासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पद मंजुरीसाठी प्रयत्न करावे, असा सल्लाही त्यांनी या वेळी देत ग्रामीण रुग्णालयासाठी केलेल्या प्रयत्नांचे दस्ताऐवज सादर केले. वर्षभरात दमडीचेही विकामकामे न करू शकलेल्या निष्क्रिय लोकप्रतिनिधी हकनाक ग्रामीण रुग्णालयाचे श्रेय घेण्याचा खटाटोप करीत असल्याचेही श्री. कदम म्हणाले.

Advertising
Advertising

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

या वेळी पिंपळगावचे माजी सरपंच भास्कर बनकर, जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाठ, सुधीर कराड, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, शिवा सुरासे, आशिष बागूल, नंदू पवार, तहसीलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी संदीप कराड, नीलेश पाटील, शाखा अभियंता झापरवाल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, डॉ. रोहन मोरे, कैलास गादड, एल. जे. जंगम, तलाठी राकेश बच्छाव, भाऊसाहेब घुमरे, माधव बनकर आदी उपस्थित होते.

निसाका सुरू करत शब्द पाळावा

निसाका सुरू होण्याचा प्रश्‍नावर माजी आमदार कदम यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. रासाका सुरू करणे सहज सोपे आहे; पण निसाका सुरू करून त्यांनी शब्द पाळावा. त्यासाठी मीही त्यांच्या पाठीशी उभा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी निफाड मतदारसंघात गटा-तटाचे राजकारण चालते. शिवाय निवडुकीत आम्ही प्रतिस्पर्धी आहोत. त्यामुळे निकोप व खिलाडूवृत्तीचे राजकारण होणे अपेक्षित आहे. पण आमदार बनकर यांच्याकडून ते होताना दिसत नाही.

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

 

संपादन - रोहित कणसे