नाताळच्या विशेष प्रार्थनेसाठी ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा; सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

Attendance limits for special Christmas prayers
Attendance limits for special Christmas prayers

नाशिक :  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ख्रिश्‍चन बांधवांनी साध्या पद्धतीने नाताळ साजरा करावा, असे आज राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. नाताळ सण साजरा करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना सरकारने जारी केल्या आहेत. त्यानुसार चर्चमधील विशेष प्रार्थना पन्नास जणांच्या उपस्थितीत व्हावी, चर्चमध्ये गर्दी होणार नाही, शारीरिक अंतर राखावे अशी अपेक्षा सरकारतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. 

या सूचनांचे पालन करणे आवश्यक

चर्चमध्ये निर्जुंतीकरण करावे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. नाताळ सणाला चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अथवा काही वस्तू ठेवल्या जातात. त्याठिकाणी शारीरिक अंतर राखत स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जाव्यात. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी दहा गायकांचा समावेश करण्यात यावा. गाण्यासाठी वेगवेगळ्या माईकचा वापर करत शारीरिक अंतर राखले जावे. चर्चच्या बाहेर दुकाने अथवा स्टॉल्स लावण्यात येऊ नयेत. शिवाय सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे, गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुका आयोजित करु नयेत. फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदुषणासंबंधीच्या नियम आणि तरतुदींचे पालन करावे. त्याचप्रमाणे चर्चमध्ये ३१ डिसेंबरला मध्यरात्री प्रार्थना न करता ती सायंकाळी सातला अथवा त्यापूर्वी करावी. ऑनलाइन प्रार्थनेची सुविधा ज्येष्ठ आणि बालकांसाठी उपलब्ध करुन देण्यात यावी. शिवाय ६० वर्षांवरील नागरिक आणि दहा वर्षांखालील बालकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. सण घरात साजरा करावा, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

शुक्रवारी ३ मिसा प्रार्थना विधी 

सरकारतर्फे कोरोना विषाणू संसर्गाच्या फैलावाच्या प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल, असे आज नाशिकमधील विविध चर्चतर्फे स्पष्ट करण्यात आले. गुरुवारी (ता. २४) रात्री चर्चमधून होणारी ‘मिसा‘ स्थगीत करण्यात आली आहे. त्याऐवजी शुक्रवारी (ता. २५) सकाळी आठ, नऊ आणि तीन अशा तीन वेळांमध्ये ‘मिसा‘ प्रार्थना पूजाविधी चर्चमधून होणार आहे.

प्रार्थना घरुन करता यावी म्हणून ऑनलाइन सुविधा करण्यात आली आहे. शिवाय बालयेशूच्या मूर्तीला स्पर्श करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिभेवर देण्याऐवजी हातावर शारीरिक अंतर राखून प्रसाद दिला जाणार आहे. हस्तांदोलनाला देखील प्रतिबंध राहणार आहे. चर्चमध्ये बाकावर बसणारे शारीरिक अंतर राखून बसतील. नाताळच्या अगोदर दहा दिवस घरोघरी जाऊन म्हटली जाणारी नाताळ गिते यापूर्वी स्थगीत करण्यात आली आहेत. 
 

हेही वाचा - निनावी पत्रावरून पोलीसांनी लावला शोध, हाती लागली धक्कादायक माहिती

बिशप हाऊसच्या ३५ चर्चमधून अन्नदान 

यंदाचा नाताळ अतिशय साध्या पद्धतीने व घरीच प्रार्थना करून साजरा करण्याचा उपदेश नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि नगर या पाच जिल्ह्याचे प्रमुख धर्मगुरू बिशप लुर्ड्स डॅनियल यांनी दिला आहे. नाशिक रोड येथील बिशप हाऊसतंर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यांमधील पस्तीस चर्चमध्ये ख्रिसमस निमित्ताने महाअन्नदान केले जाणार असल्याची माहिती फादर पीटर डिसूझा यांनी ‘सकाळ'ला दिली. बिशप लुर्ड्स डॅनियल म्हणाले, की कोरोना वैश्‍वीक संकटात जगातील सर्व प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे यासाठी धर्मगुरुंसह ख्रिस्ती बांधव घरून प्रार्थना करणार आहेत. प्रार्थना करण्यासाठी चर्चमध्ये निवडक लोक बोलवण्यात आले असून सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com