कोरोनाच्या मुकाबल्यासाठी ‘इम्युनिटी‘बद्दल विद्याशाखांमध्ये करावी जागृती - राज्यपाल कोश्यारी

महेंद्र महाजन
Tuesday, 3 November 2020

 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजीओथेअरपी विद्याशाखांचे महाविद्यालय लवकर सुरु करावेत. त्यासाठी माझा सकारात्मक प्रतिसाद असेल, अशी ग्वाही विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नाशिकमध्ये दिली.

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजीओथेअरपी विद्याशाखांचे महाविद्यालय लवकर सुरु करावेत. त्यासाठी माझा सकारात्मक प्रतिसाद असेल, अशी ग्वाही विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नाशिकमध्ये दिली. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचे नुतनीकरण आणि सौरउर्जा प्रकल्पाचे लोकार्पण राज्यपालांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

आरोग्य विद्यापीठाबद्दल गर्व 
आरोग्य विद्यापीठाबद्दल गर्व वाटतो, असे सांगून कोश्‍यारी यांनी डॉक्टर आणि शिक्षक स्वतःपेक्षा इतरांसाठी काम करतात असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ज्ञानाचे नुतनीकरण व्हावे आणि विद्यापीठाने नियमितपणे नाविन्यपूर्ण काम करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला. सौरऊर्जेला डॉ. मनमोहन सिंह हे पंतप्रधान असताना प्रोत्साहन दिले, असे आवर्जून सांगत सौरऊर्जा निर्मितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालना दिल्याची माहिती दिली. 

आरोग्य विद्यापीठाच्या आवारात सुरु करावेत महाविद्यालये
विधानसभेचे उपाध्यक्ष नहरही झिरवाळ, पालकमंत्री छगन भुजबळ, विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने अतिथी होते. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण आदी उपस्थित होते. कोरोनामध्ये प्रत्येक वैद्यकीय विद्याशाखेचा उपयोग होत असल्याचे दिसून आल्याचे सांगून कोश्‍यारी यांनी ‘इम्युनिटी‘साठी आयुर्वेद उपयोगी पडल्याचे अधोरेखित केले. तसेच होमिओपॅथीचा लाभ झाल्याचे नमूद करत त्यांनी ‘इम्युनिटी‘बद्दल सगळ्या विद्याशाखांमध्ये असलेल्या उपयोगितेची जागृती करावी आणि ज्येष्ठ डॉक्टरांनी त्याबद्दलचे ज्ञान द्यावे, असे सूचवले. 

जागेसह सर्वोतोपरी मदत 
शिक्षण-आरोग्यकडे कमी लक्ष असायचे. पण कोरोनामुळे आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला लागले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत तांत्रिक मनुष्यबळ कमी पडले. ही गरज लक्षात घेऊन आरोग्य विद्यापीठातर्फे अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. त्याबद्दल कौतुक करायला हवे. शिवाय कोरोनाची दुसरी लाट येणार म्हटले जात असल्याने आताच्या उसंतीच्या काळात कोरोनाविरुद्धच्या लढाईत पूर्वी जाणवलेल्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी आरोग्य विद्यापीठाचे मार्गदर्शन घेता येईल, असे सांगून भुजबळ यांनी विद्यापीठाच्या स्वतःच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि पदव्युत्तर संस्थेची उभारणी लवकर व्हावी, असे सांगितले. एवढेच नव्हे, तर त्यासाठी जागेसह सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. 

सगळ्या वैद्यकीय शाखांमधील ‘इम्युनिटी‘बद्दल करावी जागृती 
विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले की, विद्यापीठाने आरोग्य शिक्षणाबरोबर संशोधनाचे कार्य करावे. कोविड-19 आजाराच्या परिस्थितीत भेडसावणारे समस्या पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी विद्यापीठाने तांत्रिक मनुष्यबळाकरीता नवनवीन अभ्यासक्रम सुरु करीत आहे. विद्यापीठ परिसरात नवीन महाविद्यालय सुरु करण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक मदत तसेच निधी देण्यात येईल असे सांगितले. 

ऊर्जेचे विद्यापीठ व्हावे 
आरोग्य विद्यापीठ ऊर्जेचे व्हावे, असे सांगून श्री. देशमुख म्हणाले,की कोरोना संसर्गामध्ये आरोग्य विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना विद्यापीठाने कोविड सुरक्षा कवच योजना सुरु केली. प्रतिकुल परिस्थितीत निर्णय घेताना यशाच्या दिशेने वाटचाल करत राहणे गरजेचे आहे. वैद्यकीय शाखेबरोबर आयुर्वेद, होमिओपॅथी, योगा, सिध्द आदी विद्याशाखांनी एकत्र येऊन महत्वपूर्ण लढा दिला. समाजाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यापीठाच्या सगळ्या प्रस्तावांना पंधरा दिवसांमध्ये मंत्रीमंडळाची मान्यता घेतली जाईल. खामगांवकर यांनी विद्यापीठाचा अहवाल उपस्थितांपुढे ठेवला. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. चव्हाण यांनी आभार मानले. 

राज्यपाल अन भुजबळांची जुगलबंदी 
राज्यपाल अन् भुजबळ यांच्यात जुगलबंदी रंगली. आरोग्य विद्यापीठाच्या महाविद्यालयांचे भूमीपूजन नव्या वर्षाच्या अगोदर राज्यपालांच्या हस्ते व्हावे आणि दोन वर्षात त्यांच्या हस्ते उदघाटन व्हावे, अशी अपेक्षा श्री. भुजबळांनी नोंदवली. त्यावेळी राज्यपालांनी तुम्ही पण आहात, असे सांगितले. त्याचक्षणी आम्ही राहूच पण तुमच्या नावाला वजन असल्याने कामे लवकर होतात, असे भुजबळांनी सांगताच, उपस्थितांमध्ये हंशा पिकला. राज्यपालांना नाशिकमध्ये येता, इथले प्रश्‍न मार्गी लागतील, अशी विनंती करत असताना भुजबळांनी इथले हवामान आणि माणसे चांगले आहेत व सांस्कृतिक-धार्मिक शहर असल्याची माहिती दिली. पुढे नाशिकमध्ये राजभवन बांधा, असेही  भुजबळांनी सूचवले. 

अमीत देशमुखांचा गौरव 
राज्यपालांनी श्री. अमीत देशमुखांचा विशेष गौरव केला. राज्यात परीक्षा होऊ नये असे वातावरण तयार झालेले असताना धाडस दाखवून श्री. देशमुख यांनी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल अभिनंदन करायला हवे, असे राज्यपालांनी सांगितले. श्री. देशमुख यांच्या बुद्धीमत्ता आणि दूरदर्शीपणाबद्दलही राज्यपाल बोललेत. श्री. भुजबळ यांनी ‘बॉस'ची (माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख) यांची श्री. अमीत देशमुख यांना पाहून आठवण येत असल्याचे सांगत वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून ते कार्यरत आहेत आणि वडिलांप्रमाणे ते सुसंस्कृत आहेत, असेही स्पष्ट केले. 

वैद्यकीय महाविद्यालयात तंत्रज्ञांचे शिक्षण 
कोरोना संसर्गामध्ये वैद्यकीय इलाजात तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता भासली. त्यामुळे आरोग्य विद्यापीठातर्फे ईसीजी, व्हेन्टीलेटर, सिटीस्कॅन अशा तंत्रज्ञांच्या ९ अभ्यासक्रमांची रचना केली आहे. १०० प्रवेश क्षमतेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील या ९ अभ्यासक्रमांसाठी ४५ ते ५५ जागा असतील, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, की विद्यापीठाने परीक्षा घेऊन वेळेत निकाल जाहीर केले आहेत. तसेच आरोग्य विज्ञानाच्या सर्वच शाखांमध्ये कोविड 19 वर दर्जेदार संशोधन व्हावे यासाठी विद्यापीठातपर्फे विशेष संशोधन अनुदान उपलब्ध करण्यात आले आहे. हापकीन संस्थेसोबत संशोधनासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्याची सुरवात १ डिसेंबरपासून होईल. विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. विद्यापीठ निधीतील कर्मचाऱयांना ग्रॅच्युअटी योजना लागू करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness in faculties about immunity said by Governor Koshyari