बांग्लादेशी बनावट पासपोर्ट प्रकरण : मालेगाव मनपा कर्मचारी बडतर्फ; मनपा आयुक्तांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

शहरात दोन बांगलादेशी घुसखोर मिळून आल्यानंतर पोलिसांसमोर या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान आहे. सोमवारी (ता. ९) पोलिसांनी महापालिकेत मानधन तत्त्वावर काम करणारा कर्मचारी उल्हास महाले व जन्मदाखले तयार करून देणारा दलाल इश्‍तियाक अहमद या दोघांना अटक केली. यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या संशयितांची संख्या दहा झाली आहे. 

मालेगाव (नाशिक) : शहरात दोन बांगलादेशी घुसखोर मिळून आल्यानंतर पोलिसांसमोर या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान आहे. सोमवारी (ता. ९) आयेशानगरचे पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी महापालिकेत मानधन तत्त्वावर काम करणारा कर्मचारी उल्हास महाले व जन्मदाखले तयार करून देणारा दलाल इश्‍तियाक अहमद या दोघांना अटक केली. यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या संशयितांची संख्या दहा झाली आहे. 

कर्मचाऱ्याला मनपा आयुक्त कासार यांनी केले बडतर्फ

बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आयेशानगर पोलिसांनी अटक केलेल्या संशियतांना मंगळवारी न्यायालयाने पुन्हा सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बांगलादेशी नागरिकास जन्मदाखला बनविण्यासाठी मदत करणाऱ्या मनपाच्या कर्मचाऱ्याला मनपा आयुक्त दीपक कासार यांनी बडतर्फ केले आहे.

चार दिवसांची पोलीस कोठडी

आयेशानगर पोलिसांनी आलम अमीन अन्सारी (वय ३८) व ताहीरअली युसूफअली (रा. नईकुलसुरी, बांगलादेश) या दोन बांगलादेशी घुसखोरांसह त्यांना बनावट दस्तऐवज तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या सहा संशयितांना अटक केली होती. एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती. मनपा कर्मचारी उल्हास महाले यास देखील आयेशानगर पोलिसांनी अटक केली होती. त्यासंदर्भात पोलिसांनी मनपा आयुक्तांना पत्र दिले होते. बांगलादेशातून घुसखोरी करून शहरात अवैधरितीने वास्तव्य करून बनावट दस्तावेजाच्या आधारे पासपोर्ट बनवून शासनाची फसवणूक करणाऱ्या व त्यांना मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी बांगलादेशी नागरिकासह सहा जणांना गुरुवारी  अटक केली होती. त्यांना शुक्रवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

मंगळवारी त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने व सोमवारी सायंकाळी एका मनपा कर्मचाऱ्यासह जन्मदाखला बनविण्यासाठी मदत करणारा असे दोन जणांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी सर्व संशियतांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. 

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladeshi Fake Passport Case Malegaon Corporation Employees Fired from job