बनावट पासपोर्ट प्रकरण : संशय आणखीनच बळावला; बांगलादेशी घुसखोरांचे मालेगावातून पलायन

प्रमोद सावंत
Friday, 13 November 2020

या संशयितांना मदत करणाऱ्या मनपा मानधन कर्मचाऱ्याला यापूर्वीच बडतर्फ केले आहे. आयेशानगर व पवारवाडी पोलिस या प्रकरणी सखोल चौकशी करीत असल्याने घुसखोरांनी पलायन केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.  

मालेगाव (नाशिक) : शहरात दोन बांगलादेशी घुसखोर मिळून आल्यानंतर पोलिसांसमोर या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान आहे. बनावट दस्तऐवजांच्या आधारे शहरात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई आणि या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक झाल्याने शहरातील अन्य बांगलादेशी घुसखोरांनी पलायन केले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

संशयित बांगलादेशी नागरिक फरारी 

शहरातून आयेशानगर पोलिसांनी आलम अमीन अन्सारी (वय ३८) व ताहीरअली युसूफअली (रा. नईकुलसुरी, बांगलादेश) या दोन बांगलादेशी घुसेखोरांना अटक केली. अन्य एक संशयित जहीर हाशीम हनिबा हा बांगलादेशी नागरिक फरारी आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या घुसखोरांना बनावट दस्तऐवज व पासपोर्ट बनविण्यासाठी मदत करणाऱ्या आठ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या दहा झाली आहे. शहर व आयेशानगर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात प्रामुख्याने जुनी- पक्की वस्ती आहे. आझादनगर व पवारवाडी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात नवनवीन वसाहती वाढत आहेत. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

यापूर्वीच मनपा मानधन कर्मचारी बडतर्फ

म्हाळदे शिवार व जुना आग्रा रस्त्याला लागून दुतर्फा या वसाहती व झोपडपट्ट्या आकाराला येत आहेत. यात काही जणांचे वास्तव्य असल्याचा संशय होता. पोलिसांनी यापूर्वी अटक केलेले दोघे संशयित मुंबई-आग्रा महामार्गावरील शाही गोल्डन हॉटेलमागे पत्र्याच्या शेडमध्येच आढळून आले होते. त्यांना शहरातील काही जणांनी मदत केल्याने संशयितांनी बनावट पासपोर्ट, शिधापत्रिका, आधारकार्ड, जन्म प्रमाणपत्र व विविध दस्तऐवज तयार केले. या संशयितांना मदत करणाऱ्या मनपा मानधन कर्मचाऱ्याला यापूर्वीच बडतर्फ केले आहे. आयेशानगर व पवारवाडी पोलिस या प्रकरणी सखोल चौकशी करीत असल्याने घुसखोरांनी पलायन केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.  

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladeshi infiltrators ran away from Malegaon nashik marathi news