सिडको उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई; भाजप-शिवसेनेकडून एकमेकांवर चिखलफेक 

shivsena bjp.jpg
shivsena bjp.jpg

नाशिक : सिडकोतील वाढत्या वाहतुकीला पर्याय म्हणून त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौकदरम्यान उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आल्यानंतर त्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. भाजपच्या सत्ताकाळात पुलाला मंजुरी देण्यात आल्याने त्याचे श्रेय आम्हालाच असल्याचा दावा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला. तर, त्याला उत्तर देताना शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आमदार सीमा हिरे यांनी पुलासाठी एकही पत्रव्यवहार केल्याचे दाखवून द्यावे. नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ, असे थेट आव्हान दिले. 

पुलांसाठी शासनाकडून निधी आणा - महापौर 
वाढत्या वाहतुकीसंदर्भात अनेक वर्षांपासून तक्रारी असल्याने मायको सर्कलसह त्रिमूर्ती चौक ते संभाजी चौकदरम्यान भाजपच्या सत्ताकाळात मंजुरी देण्यात आली. अंदाजपत्रकात दोन्ही पुलांसाठी अनुक्रमे ३५ कोटी व ४० कोटींची तरतूद करण्यात आली. परंतु विरोधकांकडून या पुलाचे श्रेय लाटले जात असल्याचा आरोप महापौर सतीश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी आमदार सीमा हिरे, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील उपस्थित होते. पुलाचे श्रेय घ्यायचे असेल तर, शासनाकडून ३०० कोटींचा निधी आणावा, असे आव्हान महापौर कुलकर्णी यांनी दिले. वाहतूक कोंडीमुळे अपघात वाढल्याने पूल होणे गरजेचे आहे. या भावनेतून उड्डाणपुलाला मंजुरी दिली. परंतु विरोधकांकडून पुलाच्या कामाचे श्रेय घेणे दुर्देवी असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी सांगितले. भाजपच्या सत्ता काळात झालेल्या विकासकामांचे श्रेय विरोधकांनी जरूर घ्यावे. त्यापूर्वी पुलांसाठी तीनशे कोटींचा निधी राज्य शासनाकडून आणावा. कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करू, असे सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी सांगितले. 

पत्रव्यवहार दाखविल्यास राजीनामा - बडगुजर 
माजी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे उड्डाणपुलासाठी चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. प्रशासकीय अंदाजपत्रकात त्यांनी ३५ कोटींची तरतूद केली. आमदार सीमा हिरे यांचा या पुलाशी काहीही संबंध नाही. यासंदर्भात त्यांनी पत्रव्यवहार केल्याचे दाखविल्यास नगरसेवकपदाचा राजीनामा देईन, असे आव्हान शिवसेनेचे महानगरप्रमुख नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी दिले. महापालिका निवडणुकीच्या वचननाम्यात पूल तयार करण्याचे आश्‍वासन दिले होते. पुलासाठी निधी कमी पडत असल्याने महापौरांकडे पाठपुरावा केला. स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी वाढीव निधी दिला. खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे केंद्र सरकारमार्फत पाठपुरावा केला होता. परंतु महापालिकांसाठी विशिष्ट निधी देता येत नसल्याने महापालिकेच्या निधीतूनच पूल बांधणे क्रमप्राप्त झाले. पूल शहरासाठी बांधला जात असल्याने त्याचे श्रेय घेण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही. महापालिकेचा विश्‍वस्त म्हणून त्यावर बोलण्याचा मला अधिकार आहे. आमदार हिरे यांना श्रेय लाटण्याचा अधिकार नाही. सिडकोतील जनता त्यांना माफ करणार नसल्याचे श्री. बडगुजर म्हणाले. पुलासाठी ११९ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यासाठी बडगुजर यांनी पाठपुरावा केल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com