वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यास मारहाण, कर्मचाऱ्यांकडून "कामबंद'ची हाक

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 12 मार्च 2020

पेंढारकर यांना मारहाण झाल्याबाबत कर्मचारी संघटनांकडून निषेध नोंदविण्यात आला. संशयितांना अटक करण्याची मागणी करत कर्मचारी कृती समितीच्या सदस्यांनी "कामबंद'ची हाक दिली. तशा आशयाचे निवदेन अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांना देण्यात आले.

नाशिक : वीजबिलाच्या थकबाकी वसुलीसाठी हॉटेलचा वीजपुरवठा खंडित केल्याचा राग येऊन वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यास मारहाण केल्याचा प्रकार भद्रकाली उपविभागीय कार्यालयात घडला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी कारवाई करत एका संशयितास ताब्यात घेतले असून, दुसरा फरारी आहे. 

अशी घडली घटना...
भद्रकाली परिसरातील सर्फराज कोकणी यांच्या बादशाह तंदूर हॉटेलकडे तीन महिन्यांच्या वीजबिलापोटी 14 हजार 360 रुपये थकबाकी आहे. हॉटेलला वारंवार सूचना देऊनही बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीच्या भद्रकाली कार्यालयातील कर्मचारी सचिन धारणकर आणि सिद्धार्थ गांगुर्डे यांनी बुधवारी (ता. 11) हॉटेलचा वीजपुरवठा खंडित केला. याचा राग धरून कोकणी आणि त्याचा सहकारी आयुब पठाण या दोघांनी सकाळी अकराच्या सुमारास कार्यालयात येऊन सहाय्यक अभियंता शशांक पेंढारकर (वय 37, रा. कोणार्कनगर) यांना शिवीगाळ व मारहाण केली. अन्य कर्मचारी आणि परिसरातील दुकानदारांनी मध्यस्थी करत वाद सोडविला. त्यानंतर पेंढारकर भद्रकाली पोलिस ठाण्यात गेले असता या दोघांनी तेथे जाऊन त्यांना शिवीगाळ केली. याबाबत माहिती मिळताच, वीज वितरणचे अधिकारी, कर्मचारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठले व संशयितांवर कारवाईची मागणी करत घटनेचा निषेध केला. दरम्यान, पोलिसांनी आयुब पठाण यास ताब्यात घेतले असून, कोकणीचा शोध सुरू आहे. पेंढारकर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला. 

Image may contain: one or more people and people standing

अर्धा तास वीजपुरवठा खंडित 
पेंढारकर यांना मारहाण झाल्याबाबत कर्मचारी संघटनांकडून निषेध नोंदविण्यात आला. संशयितांना अटक करण्याची मागणी करत कर्मचारी कृती समितीच्या सदस्यांनी "कामबंद'ची हाक दिली. तशा आशयाचे निवदेन अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांना देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की मुख्य संशयित कोकणी याच्याकडून पुन्हा हल्ला होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यास ताब्यात घेईपर्यंत कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. निवेदनावर एस. व्ही. बेलदार, पी. टी. हरकर, बी. एस. भास्कर, पी. एम. गवळे, अन्वर तडवी, जी. आर. कापडणीस आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Image may contain: people sitting and indoor

कर्मचारी संघटनांकडून कामबंदची नोटीस
मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनांनी कामबंदची नोटीस दिली आहे. ग्राहकांनी थकबाकी भरणे आवश्‍यक आहे. असे प्रकार थांबले पाहिजे. -प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंता 

क्लिक करा > VIDEO :...अन् जवानाचे पॅराशूट अडकले बाभळीच्या झाडावर...मग...

सहाय्यक अभियंता पेंढारकर यांना मारहाणीच्या घटनेचा कर्मचारी कृती समितीकडून निषेध व्यक्त करतो, असे प्रकार घडू नयेत. संशयितांना ताब्यात न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा राहील. -लक्ष्मण बेलदार, सहसचिव, एसईए संघटना 

वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता पेंढारकर यांना वीजपुरवठा खंडित केल्याच्या कारणातून दोघांनी मारहाण केली. त्यापैकी एकास ताब्यात घेतले असून, एक संशयित फरारी आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. -साजन सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक  

हेही वाचा > लग्न जमण्याच्या आधीच 'दोघांना' भेटणं पडलं चांगलच महागात...! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating Electricity Distribution Assistant Engineer work stop agitation by staff