esakal | शेतकऱ्यांनो! तुमच्या देखण्या पीकांवर होणार बक्षीसांची बरसात; कृषी विभागातर्फे स्पर्धा
sakal

बोलून बातमी शोधा

crops.jpg

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासह प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन त्याचे मनोबल वाढविण्यासाठी कृषी विभागाने अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या स्पर्धेचे नव्या रुपात आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांनो! तुमच्या देखण्या पीकांवर होणार बक्षीसांची बरसात; कृषी विभागातर्फे स्पर्धा

sakal_logo
By
संतोष विंचू

नाशिक / येवला : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासह प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन त्याचे मनोबल वाढविण्यासाठी कृषी विभागाने अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या स्पर्धेचे नव्या रुपात आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षापासून ही स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये आयोजित न करता एकाच वर्षात आयोजित केली जाणार असून शेतकऱ्यांची उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर बक्षिसांची बरसात होणार आहे. 

एकाच वर्षात स्पर्धा घेण्याचा निर्णय
नव्या स्वरूपात आलेली पिक स्पर्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी असून यामध्ये अभ्यासपूर्ण विचार करून समित्यांचे पुनर्घटन, पात्रतेचे निकष, विजेते संख्या, स्वरूप, बक्षीसांच्या रकमेत वाढ केली आहे. यापूर्वी शेतकऱ्याला सर्वोच्च पारितोषिक मिळवण्यासाठी शेतात तीन वर्षे सातत्याने तेच पीक घ्यावे लागत होते. मात्र नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास उत्पादकतेतील घट शेतकऱ्यांना नाउमेद करते. या बाबी टाळण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमुलाग्र बदल करत एकाच वर्षात स्पर्धा घेण्याचा निर्णय झाला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ करणे अपेक्षित आहे. 

अशी राहील समिती 
पीक कापणी करण्यासाठी ग्राम पातळीवरील समितीचे अध्यक्ष पर्यवेक्षण अधिकारी असतील तर सदस्य सहभागी लाभार्थी शेतकरी सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतिशील शेतकरी, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक समितीत राहतील.पीकस्पर्धा निकाल घोषित करणेसाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती असले. पीक स्पर्धेबद्दल अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार या समितीला असून निर्णय राज्य पातळीवरील सर्व सहभागी स्पर्धकांना बंधनकारक राहील. समितीत सदस्यपदी कृषी संचालक विस्तार व नियोजन, कृषी सहसंचालक विस्तार व प्रशिक्षण-१, कृषी सहसंचालक, विस्तार व प्रशिक्षण-२, कृषी सहसंचालक, विस्तार व प्रशिक्षण ३, मुख्य सांख्यिकी, कृषी आयुक्तालय राहतील तर सदस्य सचिव कृषी उपसंचालक (माहिती) असतील.

३१ डिसेंबरपर्यंत सहभागाची संधी
राज्य आणि विभागस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते वगळून, संबंधित जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील स्पर्धकांमधून जिल्हास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. तर राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीकस्पर्धा विजेते वगळून, संबंधित तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील स्पर्धकांमधून तालुकास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील. स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामात मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै तर इतर पिकासाठी ३१ ऑगस्टपर्यत आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी ३१ डिसेंबरपर्यत अर्ज दाखल करता येईल. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

स्पर्धेमध्ये सहभागी पिके.. 
* खरीप पिके - भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (राग), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सूर्यफूल. 
* रब्बी पिके - ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ. 

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

असे आहे बक्षिसे (प्रथम, द्वितीय, तृतीय) 
सर्वसाधारण व आदिवासी गट 

- तालुका पातळी - ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये. 
- जिल्हा पातळी- १० हजार, ७ हजार व ५ हजार हजार रुपये. 
- विभाग पातळी - २५ हजार, २० हजार व १५ हजार रुपये. 
- राज्य पातळी- ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये. 

(संपादन -भीमराव चव्हाण)