सिनेस्टाइल थरार! "डिकी उघडा' सांगताच त्याने ठोकली धूम...डिकीमध्ये असे काय होते?

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 27 April 2020

गंगापूरकडून भरधाव आलेली संशयास्पद कार आणि तिचा पाठलाग करताना तीन पोलिस ठाण्यांच्या सात-आठ गाड्या. वाहनातील मद्य लपविण्याच्या नादात हा सिनेस्टाइल थरार रविवारी (ता. 26) अनुभवला मिळाला. पोलिसांनी तपासणीसाठी चारचाकीची डिकी उघडायला लावताच संशयितांनी वाहन वेगाने पळवत धूम ठोकली. अखेरीस...

नाशिक : गंगापूरकडून भरधाव आलेली संशयास्पद कार आणि तिचा पाठलाग करताना तीन पोलिस ठाण्यांच्या सात-आठ गाड्या. वाहनातील मद्य लपविण्याच्या नादात हा सिनेस्टाइल थरार रविवारी (ता. 26) अनुभवला मिळाला. पोलिसांनी तपासणीसाठी चारचाकीची डिकी उघडायला लावताच संशयितांनी वाहन वेगाने पळवत धूम ठोकली. अखेरीस जुन्या नाशिकमध्ये पांगरे मळ्यात पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली. 

"डिकी उघडा' सांगताच ठोकली धूम..काय होते डिकीत?
सागर विलास जाधव (वय 24, रा. गोपाळकृष्ण चौक, भुजबळ फार्मजवळ, सिडको), मोतीराम चिंतामण शेवरे (20, रा. शिवशक्ती चौक, अंबड) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 26) सायंकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास इंडिका कार (एमएच 04, बीएस 3881) गंगापूर गावाकडून आली. त्या ठिकाणी गंगापूर पोलिसांकडून नाकाबंदी होती. कार रोखल्यानंतर यातील संशयित सागर जाधव याने सरकारी कर्मचारी असल्याचे ओळखपत्र दाखविले. तरीही पोलिसांनी कारची डिकी उघडण्याची सूचना केली. पोलिस डिकीकडे गेले असता, संशयिताने कार सातपूरच्या दिशेने वेगात पळविली. पोलिसांनी घटनेची माहिती वायरलेसने नियंत्रण कक्षाला दिली. त्यामुळे सातपूर पोलिस सावध झाले. सातपूरमध्येही कार रोखण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु संशयितांनी कार पपया नर्सरीकडे अंबडच्या दिशेने पळ काढला. अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव व त्यांचे पथक गस्तीवर असताना त्यांना घटनेची खबर मिळाली. त्यांनीही संशयित कारचा पाठलाग सुरू केला. 

हेही वाचा > संचारबंदीतही 'ते' 'मालेगाव टू सिडको'?...अन् नातेवाईकांनीही दिला आसरा...कारवाई तर होणारच!

कारमधून बिअरच्या बाटल्या जप्त : दोघे संशयित ताब्यात 
गंगापूर, सातपूर, अंबड, इंदिरानगर, मुंबई नाका पोलिस ठाण्यांची पोलिस वाहने व निर्भया वाहनही संशयित कारच्या मागावर होते. संशयिताने कार महाले पेट्रोलपंपाकडून लेखानगर, बडदेनगरकडून पांगरे मळ्यात घुसविली. परंतु त्या ठिकाणी रस्ता बंद असल्याने कारमधील दोघा संशयितांनी कार सोडून नाल्याच्या दिशेने पळ काढला. त्या वेळी इंदिरानगर व अंबड बीटमार्शल पोलिसांनी दोघांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्‍या आवळल्या. कारमधून बिअरच्या 25 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित सागर जाधव सरकारी कर्मचारी नसून, निवडणुकीच्या काळात त्यास तात्पुरत्या स्वरूपात तांत्रिक सहाय्यक म्हणून घेतले होते. तेच जुने ओळखपत्र त्याने गंगापूरच्या नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांना दाखविले होते. दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी यादरम्यान काही ठिकाणी बॅरिकेड्‌सला धडकही दिली होती.  

हेही वाचा > photos : धक्कादायक! भीतीपोटी 'त्यांनी' उंटदरीत उड्या मारल्या खऱ्या...पण पुढे मात्र..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beer bottles seized from car Two suspects in custody nashik marathi crime news