"किसान रेल्वेला लासलगावला स्टॉपेज द्या" - छगन भुजबळ

अरुण खंगाळ
Tuesday, 8 September 2020

लासलगाव येथे आशियातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजारपेठ आहे. नाशिक जिल्हा व लगतच्या परिसरातील शेतकरी लासलगाव येथे आपल्या शेतीमाल लासलगांव मार्केट यार्ड येथे विपणन व साठवणीसाठी आणतात.

 

नाशिक/लासलगांव :  केंद्र शासनाच्या वतीने नुकतीच देवळाली ते दानापूर ही देशातील पहिली किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. सदर किसान रेल्वेला आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव रेल्वे स्थानकात मात्र स्टॉपेज देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी असून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने लासलगांव रेल्वे स्थानकात किसान रेल्वेला स्टॉपेज देण्यात यावे अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. 

शेतकऱ्यांना मोठा फायदा

याबाबत छगन भुजबळ यांनी पियुष गोयल यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या वतीने देवळाली ते दानापूर पर्यंत देशातील पहिली किसान रेल्वे सुरू केली आहे. यामाध्यमातून नाशवंत भाजीपाला व नाशिक जिल्ह्यातील फळांची उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये जलद वाहतूक करण्यात येऊन चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याने हा किसन रेल्वे उपक्रम कौतुकास्पद आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या उपक्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजारपेठ

त्यांनी म्हटले आहे की, सुरुवातीला ही किसान रेल आठवड्यातून एकदा चालू होती परंतु लोकप्रियता आणि जास्त मागणीमुळे ती आता आठवड्यातून तीनदा धावते. परंतु या किसान रेल्वेला लासलगाव, जि. नाशिक येथे स्टॉपपेज नाही. लासलगांव येथे आशियातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजारपेठ आहे. नाशिक जिल्हा व लगतच्या परिसरातील शेतकरी लासलगाव येथे आपल्या शेतीमाल लासलगांव मार्केट यार्ड येथे विपणन व साठवणीसाठी आणतात. त्यामुळे लासलगांव परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने लासलगांव रेल्वे स्थानकात किसान रेल्वे ला स्टॉपेज देण्याची नितांत आवश्यकता असून लवकरात लवकर किसान रेल्वे ला लासलगाव येथे स्टॉपेज देण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केलेली आहे.

हेही वाचा > धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा

  संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhujbal demands kissan railway stoppage for lasalgaon nashik marathi news