esakal | "देवमामलेदारांचा त्याग, समर्पणाचा आदर्श घराघरांत पोचायला हवा" -  राज्यपाल कोश्यारी

बोलून बातमी शोधा

Bhumipujan of Devmamaledar Smarak renovation work}

देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक नूतनीकरण कामाचे भूमिपूजन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले

"देवमामलेदारांचा त्याग, समर्पणाचा आदर्श घराघरांत पोचायला हवा" -  राज्यपाल कोश्यारी
sakal_logo
By
अंबादास देवरे

सटाणा (जि. नाशिक) : रामासोबत वानरसेना होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे सोबत घेऊन स्वराज्य उभे केले. त्याचप्रकारे कोणत्याही सेवाकार्यात सर्वांचा सहभाग आवश्यक असतो. देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचे शुद्ध चारित्र्य, असीम साहस आणि जनसेवेचा आदर्श जगाला घेता येईल. जीवनात उंची गाठण्यासाठी हा सेवाभाव आवश्यक आहे. समाजात सेवाभाव रुजविण्यासाठी श्री यशवंतराव महाराज यांच्या जीवनातील त्याग आणि समर्पणाचा आदर्श घराघरांत पोचला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी (ता. ३) केले. 

 लघुपट निर्मितीसाठी निधी देण्याचेही सहकार्य

राज्यपाल म्हणाले, की स्वार्थामध्ये परमार्थ साधला तर आपण श्रेष्ठ ठरतो. सर्वच अधिकारी देवमामलेदार बनू शकणार नाहीत. मात्र आपल्या 
आचार-विचारात पन्नास टक्के सुधारणा करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा. एखाद्या अधिकाऱ्याला देवपण मिळणे फार क्वचित घडते. आपल्यातील देवत्वाला जागृत करण्याचा संदेश सर्व संतांनी दिला आहे. त्यांचे चरित्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनादेखील प्रेरणा देणारे असून, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या आगामी मसुरी येथील प्रशिक्षण प्रबोधिनीत ते पोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. देवमामलेदारांच्या जीवन चरित्रावर आधारित लघुपट निर्मितीसाठी निधी देण्याचेही सहकार्य करण्याचे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी दिले. देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक नूतनीकरण कामाचे भूमिपूजन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. या वेळी दगाजी चित्रमंदिरात झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

तीर्थस्थळाला ‘ब’ वर्ग दर्जा 

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, की पुढील पन्नास वर्षांचा विचार करून देवमामलेदार यांचे सर्व सुविधांनी युक्त, आकर्षक आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून सहकार्य करण्यात येईल. हे स्मारक आणि मंदिर अंधश्रद्धेचे ठिकाण नसून ‘सेवा हाच धर्म’ असा संदेश देणारे, सेवेचा आदर्श प्रस्तूत करणारे देवस्थान आहे. या तीर्थस्थळाला ‘ब’ वर्ग दर्जा दिला जाईल. देशात लौकिक होईल, असे उत्तम स्मारक उभे करून शहर देव्हाऱ्या‍यासारखे स्वच्छ ठेवावे, असे आवाहनही भुजबळ यांनी केले. 

सटाणा पर्यटनस्थळ होणार

कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले, की देवमामलेदारांच्या स्मारकामुळे सटाणा शहराचा विकास होईल. आता सटाणा शहरातील भूमिगत गटारींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सांघिक प्रयत्न करू. प्रास्ताविकात नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पालकमंत्री भुजबळ, कृषिमंत्री भुसे, माजी मंत्री रावल आणि खासदार डॉ. भामरे यांच्या प्रयत्नामुळे स्मारक उभे राहिले असून, सटाणा हे पर्यटनस्थळ होण्यासाठी प्रयत्नशील आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ अध्यक्षस्थानी होते. कृषिमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, आमदार जयकुमार रावल, नगराध्यक्ष सुनील मोरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, शंकरराव सावंत, राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, राजभवनाच्या उपसचिव श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक सचिन पाटील प्रमुख पाहुणे होते. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

‘आदित्य ठाकरेंचा विसर कसा?’ 

पालकमंत्री भुजबळ यांनी भाषणात सर्वपक्षीय नगराध्यक्ष असा उल्लेख करताच एकच हशा पिकला. आदित्य ठाकरे पर्यटनमंत्री असल्याने त्यांचा विसर नगराध्यक्षांना कसा पडला, असा प्रश्न कृषिमंत्री भुसे यांनी उपस्थित करताच स्मारकाला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून त्याचे उद्‌घाटन थेट ठाकरे यांच्याच हस्ते करायचे आहे. त्यांना आमंत्रण देण्यासाठी भुसेसाहेब आमच्यासोबत असतील, असे समर्पक उत्तर नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी देताच टाळ्यांचा कडकडाट झाला.