उड्डाणपुलाचे भूमिपूजन फडणवीस यांच्याच हस्ते होणार; भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर

Bhumipujan of flyover will be done by Fadnavis nashik marathi news
Bhumipujan of flyover will be done by Fadnavis nashik marathi news

नाशिक : उड्डाणपूल रद्द करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्यानंतर पुलाच्या भूमिपूजनाचा अधिकार भाजपने गमावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन केल्यास विरोध करण्याची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला भाजपने जशास तसे उत्तर देताना त्यांच्याच हस्ते उद्‌घाटन करू, असे आव्हान दिले. सभागृह नेते सतीश सोनवणे व गटनेते जगदीश पाटील यांच्या संयुक्त पत्रात आयुक्त सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करण्यात आला. 

आयुक्तांवर राज्य सरकारचा दबाव? 

सिडकोतील त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथे दोन उड्डाणपुलांवरून गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली शाब्दिक चकमक अद्यापही कायम आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी भाजपवर केलेल्या आरोपांना गुरुवारी (ता. २१) प्रत्युत्तर देण्यात आले. राज्यातील ठाकरे सरकारचा प्रशासनावर मोठा दबाव असून, भाजपची सत्ता असल्याने कामे होऊ दिली जात नाहीत. कर्ज उभारण्यास दिलेला नकार हा त्यातलाच एक प्रकार आहे. अडीचशे कोटींचे कर्ज उभारताना सर्वच नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामे करण्याचा प्रयत्न होता. मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असल्याने विरोधी पक्ष शिवसेना हतबल झाला आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आयुक्त कैलास जाधव यांच्यावर दबाव आणून विकासकामांना एकतर्फी स्थगिती आणली जात आहे. कर्ज उभारण्याची गरज का निर्माण झाली, याचे आत्मपरीक्षण विरोधी पक्षाने केले नसल्याचे सोनवणे व पाटील यांच्या संयुक्त पत्रात म्हटले आहे. 

शिवसेनेचे बेगडी प्रेम 

त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथील उड्डाणपुलाला स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने महापौर कुलकर्णी यांनी पुलाचे काम स्थगित करण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी विविध विकासकामांना स्थगिती दिली. त्या वेळी तो निर्णय केंद्र सरकार घेऊ शकते, असे शिवसेना नेते का म्हटले नाही, असा टोला सोनवणे यांनी शिवसेनेला हाणला. विकासकामांसाठीच्या कर्जाला शिवसेनेचा विरोध आहे. घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीच्या खासगीकरणाऐवजी सुशिक्षित बेरोजगारांमार्फत काम करवून घेण्याच्या भाजपच्या भूमिकेलाही त्यांचा विरोध आहे. महासभेच्या कामकाजात व्यत्यय आणून बंद पाडणे, हे उद्योग शिवसेनेकडून सुरू आहेत. चुकीच्या वर्तनातून भाजपची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू असून, हे बेगडी प्रेम असल्याचे सोनवणे यांनी म्हटले. 

सेनेला निवडणुकांची घाई : पालवे 

शिवसेनेच्या नेत्यांना चुकीच्या पद्धतीने सत्ता मिळविण्याची घाई झाली असून, दोन दिवसांवर निवडणुका आल्या असे त्यांना वाटत आहे. परंतु, अशा पद्धतीने चुकीचे आरोप व कामकाज करून सत्ता मिळविता येत नाही. भाजपलाही जशास तसे उत्तर देता येईल; परंतु आम्हाला विकासकामे करायची आहेत. भांडणे, वाद घालणे आमची संस्कृती नाही. मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असल्याने शिवसेनेच्या पोटात दुखत असल्याचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी म्हटले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com