बायोडिझेल प्रकरणात चंदनपुरी शिवारातील पंपावर कारवाई, 'इतके' लीटर बायोडिझेल सील

biodiesel case petrol pump sealed in chandrpuri area nashik marathi news
biodiesel case petrol pump sealed in chandrpuri area nashik marathi news

नाशिक/मालेगाव : केंद्र शासनाने बायोडिझेल विक्रीस संमती दिल्यानंतर अवैधरीत्या कुठलाही परवाना न घेता राज्यभरात बायोडिझेलमध्ये भेसळ करून सर्रास विक्री सुरू होती. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत होता. नाशिक जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर्स वेलफेअर असोसिएशनने यासंदर्भात तक्रारी केल्या. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री छगन भुजबळ आदींनी या तक्रारींची गंभीर दखल घेतली. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा तथा राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख कैलास पगारे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना बायोडिझेल व डिझेल यांचे मिश्रण करून विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे निर्देश दिले होते. 

बायोडिझेल विक्रीचा पंप सील

शहराजवळील चंदनपुरी शिवारातील राजस्थान ढाब्याशेजारील व्हीआरएल लॉजिस्टिक या कंपनीचा अनाधिकृत बायोडिझेल विक्रीचा पंप बुधवारी (ता.२) दुपारी महसूल, पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सील केला. या कारवाईत महसूलच्या पथकाने सुमारे सव्वातीन लाखाचे ६ हजार ४९४ लीटर बायोडिझेल, वाटपाचा डिसप्ले, बायोडिझेल साठा करण्याची सुमारे ३० हजार लीटरची टाकी व पत्रा शेडची कॅबीन आदींना सील केले. बायोडिझेलचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. मीटर युनिट बंद करतानाच बायोडिझेल पंपाचे दोन आऊटलेट सील करण्यात आले. 

व्हीआरएल लॉजिस्टिक  वर राज्यातील ही पहिलीच कारवाई

व्हीआरएल लॉजिस्टिक लिमिटेडच्या पंपावरील राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे. तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डी. बी. वाणी, परिवीक्षाधीन नायब तहसीलदार विकास पवार, पुरवठा निरीक्षक अशोक साबणे आदींनी पंपाची चौकशी व कारवाईसाठी दुपारी छापा टाकला. या वेळी पंपावर संदीप खैरनार व सुमित पगारे हे कंपनीचे कर्मचारी कामावर होते. अधिकाऱ्यांनी संबंधितांना पेट्रोलपंपाच्या परवान्याबाबत विचारणा केली असता चंदनपुरी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र व वैद्यमापन विभागाचा परवाना वगळता अन्य कुठलीही कागदपत्र आढळून आली नाहीत. यानंतर पथकाने सील करण्याची कार्यवाही केली. 

सकाळ इम्पॅक्ट

राज्यातील बायोडिझेल भेसळीचा काळाबाजार ‘सकाळ’ने उघडकीस आणल्यानंतर राज्यातील शेकडो पंप बंद तर काही पंप रातोरात गायब झाले. आठवड्यापूर्वी निफाड येथील पंपालाही सील ठोकले. राज्याच्या सीमेवरील गुजरातमधील सुरत व वापी जिल्ह्यातील ७० हून अधिक पंप बंद झाले.

जिल्ह्यातील चौथी कारवाई 

बायोडिझेल भेसळीच्या ‘सकाळ’ च्या दणक्यानंतर जिल्ह्यात सर्वप्रथम येथील जाफरनगरात छापा टाकून भेसळीचे बायोडिझेल ट्रकसह जप्त करण्यात आले. सोमपूर (ता. बागलाण) शिवारातही दोन हजार लिटरचा अवैध बायोडिझेल साठा जप्त झाला. निफाड येथील पंप सील करण्यात आला. त्यानंतरची ही चौथी कारवाई आहे. या कारवाईचे नाशिक जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर्स वेलफेअर असोसिएशनने स्वागत केले आहे. 

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून कारवाईचे आदेश 

विविध राज्यातील बायोडिझेल भेसळ, अवैध पंप, अनाधिकृत विक्री या संदर्भात पेट्रोलियम मंत्रालयाला मोठ्या प्रमाणात तक्रारी गेल्यानंतर अवैध बायोडिझेल विक्रीमुळे केंद्र व राज्य शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत असल्याने अवैध बायोडिझेल विक्री करणाऱ्यांवर राज्य शासनाने मार्गदर्शक तत्त्वानुसार कारवाई करावी, असे आदेश मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुनीलकुमार यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या सचिवांना काढले. २७ ऑगस्ट २०२० ला हा आदेश देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com