नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांना स्वगृही परतण्याचे वेध; दलबदलू नेत्यांवर भाजपचा वॉच 

BJP is keeping a watch on the leaders
BJP is keeping a watch on the leaders

नाशिक : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत अन्य पक्षांतून येऊन भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक पुन्हा स्वगृही परतण्याची भाषा करू लागल्याने संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी भाजपकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्या मातब्बर नगरसेवकांवर वॉच ठेवण्यास सुरवात झाली आहे. तसेच पक्षापासून दुरावलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची तयारीही सुरू आहे. 

भाजपने २०१७ च्या महापालका निवडणुकीत अन्य पक्षांतील निवडून येण्याची क्षमता असलेल्या नगरसेवकांना भाजपच्या तिकिटावर निवडून आणत प्रथमच महापालिकेत एकहाती सत्ता मिळविली. पण चार वर्षांत पक्षांतर्गत चढाओढीमुळे भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकचा भ्रमनिरास झाला. अनेकांची मने सत्ताकारणातून दुभंगली. त्यात राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अस्तित्वात आल्याने भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांना स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा असलेले एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या भक्कम गडाला तडे जाण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळेच उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये सत्ता अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे. त्यासाठी पक्षांतर्गत डागडुजी करताना, पूर्वाश्रमीच्या अन्य पक्षांमधील नगरसेवकांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष गट कार्यरत करण्यात आला आहे. 

सानप भाजपच्या वाटेवर? 

पक्षातील नाराज नगरसेवकांवर नजर ठेवतानाच, पक्षातून गेलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यात माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे नाव आघाडीवर आहे. विधानसभा निवडणुकीत सानप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, तर पराभवानंतर शिवसेनेत गेले. महापौर निवडणुकीवेळी सानपसमर्थक बारा नगरसेवकांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली होती. परंतु एनवेळी माघार घेत भाजपकडून मतदान केल्याने पक्षाची अब्रू वाचली होती. आगामी निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले नगरसेवक व सानपसमर्थक नगरसेवकांनी पक्ष सोडल्यास मोठ्या नुकसानीची शक्यता व त्यातून मतदारांमध्ये वेगळाच संदेश जाण्याची भीती निर्माण झाल्याने त्यातून एकीकडे नगरसेवकांवर वॉच ठेवताना दुसरीकडे सानप यांना भाजपमध्ये प्रवेश देत समर्थक नगरसेवकांना थोपवून धरण्याची चाल खेळली जात आहे. 

महाजन जळगावात 

दहा ते बारा वर्षांपासून नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात अधिक रस घेणारे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भात नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या तक्रारी आहेत. त्यामुळे खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यातील पडझड थांबविण्याचे निमित्त करून महाजन यांना पुढील काही वर्षे जळगावातच ठेवले जाणार असल्याने नाशिकमधील शहर व जिल्ह्यातील भाजपच्या राजकारणाची सूत्रे नवीन नेतृत्वाकडे देण्याची तयारी सुरू आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com