लॉकडाऊनमध्येही पैसे खाण्यात गाठला नंबर..बंद काळातही अशा घटना ?

संतोष विंचू : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 2 जून 2020

नागरिक तर घराच्या बाहेरच पडत नसल्याने अनेक शासकीय कार्यालये जणू ठप्प झाल्याचे चित्र होते. या काळात सर्वतोपरी व्यवहार ठप्प झाले असूनही नागरिकांच्या कामांसाठी लाच घेण्याची मानसिकता झालेल्या काही नोकरदारांनी आपले हे काळे व्यवहार सुरूच ठेवल्याने या काळातही घटना घडल्या. 

नाशिक / येवला : कोरोनामुळे लॉकडाउनमध्ये सगळे व्यवहार ठप्प झाले. अनेकांना रुपया म्हणता रुपया मिळेना... सर्वत्र व्यवहार ब्रेकडाउन असताना या काळातही राज्यातील लाचखोरी मात्र सुसाट असल्याचे पुढे आले आहे. लॉकडाउन काळात राज्यात 95 ठिकाणी लाचेच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सर्व काही बंद काळात या घटना घडल्याच कशा हा प्रश्‍न अनेकांना पडत आहे. 

कामांसाठी लाच घेण्याची मानसिकता सुरूच
डिसेंबरपर्यंत राज्यात सर्वाधिक लाचखोरीचे गुन्हे महसूल विभागात उघडकीस आले, तर दुसऱ्या स्थानी पोलिस विभाग होता. नव्या वर्षात हा आकडा याच वेगाने पुढे जात असताना 18 मार्चपासून लॉकडाउन सुरू झाला. 24 मार्चपासून तर त्याची काटेकोर अंमलबजावणी होऊ लागली, अनेक शासकीय कार्यालयांना सुटी, तर अनेक ठिकाणी 10, 20 किवा 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली. नागरिक तर घराच्या बाहेरच पडत नसल्याने अनेक शासकीय कार्यालये जणू ठप्प झाल्याचे चित्र होते. या काळात सर्वतोपरी व्यवहार ठप्प झाले असूनही नागरिकांच्या कामांसाठी लाच घेण्याची मानसिकता झालेल्या काही नोकरदारांनी आपले हे काळे व्यवहार सुरूच ठेवल्याने या काळातही घटना घडल्या. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश
मार्च महिन्यात बऱ्यापैकी व्यवहार सुरू असल्याने राज्यात 58 सापळे यशस्वी होऊन 86 आरोपी सापडले. एप्रिलमध्ये तर अतिशय कडक अंमलबजावणी होऊनही सात सापळ्यांत नऊ आरोपी अडकले. मेमध्ये बहुतांशी निकष शिथिल झाल्याने पुन्हा संख्या वाढली आणि 30 सापळे यशस्वी होऊन 43 आरोपींना पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. 

हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क 

असे झाले लाचखोरीचे सापळे... 
महिना - 2019 - 2020 
जानेवारी - 71 - 68 
फेब्रुवारी - 87 - 72 
मार्च - 78 - 58 
एप्रिल - 58 - 7 
मे - 76 - 30 
एकूण - 370- 235 

हेही वाचा > आजी-आजोबांची भेट.. अवघड वळणाचा घाट.. जणू वाट बघत होता तिघांचा काळ

 लॉकडाउन काळातही आमचे कार्यालय सुरू होते. लोकांच्या तक्रारी आल्या की त्यावर कार्यवाही करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यानुसार आमचा विभाग या आपत्तीतही सेवेत काम करत असल्यानेच या घटना उघडकीस आल्या आहेत. नागरिकांनीदेखील कोणी लाच मागत असल्यास त्याला प्रोत्साहन न देता तत्काळ आमच्या विभागाची संपर्क करावा.- सुनील कडासने, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bribery in lockdown nashik marathi news