‘बर्ड फ्लू’ राज्यात पोचला असतानाही ब्रॉयलरच्या भावात वाढ; उलट मागणी वाढली

महेंद्र महाजन
Tuesday, 12 January 2021

एकीकडे ब्रॉयलर कोंबड्यांचे भाव वाढत असताना शेतकऱ्यांमध्ये भाव कोसळतील काय, अशी घालमेल सुरू झाली होती. अशा परिस्थितीत दोन दिवसांमध्ये भावात सुधारणा झाली आहे.

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गावेळी पसरलेल्या अफवेच्या काळात मागील ‘बर्ड फ्लू’प्रमाणे ब्रॉयलर कोंबड्यांच्या मागणीत ८० टक्क्यांनी घट झाली होती. आता मात्र राज्यात ‘बर्ड फ्लू’ पोचला असताना ब्रॉयलर कोंबड्यांच्या भावात किलोला १० रुपयांनी वाढ झाली आहे. सोमवारी (ता. ११) विशेषतः गुजरातप्रमाणे विदर्भ आणि मुंबईतून मागणी वाढल्याचे शेतकऱ्यांना आढळून आले. 

‘बर्ड फ्लू’ राज्यात पोचला असताना ब्रॉयलरच्या भावात वाढ 
राज्यातील ‘पोल्ट्री इंडस्ट्री’ कोरोनाच्या काळात पसरलेल्या अफवेच्या दणक्यातून सावरत असताना गेल्या आठवड्यात ब्रॉयलर कोंबड्यांचा भाव किलोला ९० रुपयांपर्यंत पोचला होता. अशातच, ‘बर्ड फ्लू’च्या लागणची चर्चा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी ब्रॉयलर कोंबड्या विकण्याची घाई केली. त्यामुळे हाच भाव ५५ रुपयांपर्यंत घसरला होता. वीस टक्क्यांनी घसरलेली मागणी त्यासाठी कारणीभूत ठरली होती. मुळातच, कोरोनाच्या अफवेतून पोल्ट्री सावरण्यासाठी ग्रामीण भागात चिकनचा वाढलेला खप कारणीभूत ठरला होता, असे ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादक श्रीकृष्ण गांगुर्डे यांनी सांगितले. एकीकडे ब्रॉयलर कोंबड्यांचे भाव वाढत असताना शेतकऱ्यांमध्ये भाव कोसळतील काय, अशी घालमेल सुरू झाली होती. अशा परिस्थितीत दोन दिवसांमध्ये भावात सुधारणा झाली आहे. किलोला ५५ रुपयांवरून ब्रॉयलर कोंबडीचा भाव ६० आणि सोमवारी ६५ रुपये किलो असा झाला. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

उत्पादनात ५० टक्क्यांनी घट 
‘बर्ड फ्लू’ची चर्चा सुरू झालेली असताना शेतकऱ्यांनी ब्रॉयलर कोंबड्यांच्या विक्रीचा सपाटा लावलेला असताना, दुसरीकडे गेल्या आठवडाभरापासून पिल्ले टाकण्याकडील हात आखडता घेतला आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात ब्रॉयलर कोंबड्यांच्या उत्पादनात ५० टक्क्यांनी घट अपेक्षित आहे. दरम्यान, ‘बर्ड फ्लू’च्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने चिकन, अंड्यांवर बंधन न घालता शिजवून खाण्यास सांगितल्याने ग्राहकांमधील घबराट वाढलेली नाही, असे ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादक उद्धव अहिरे यांनी सांगितले. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

येत्या आठवड्यात मागणीची अपेक्षा 
संक्रांत आणि करीच्या अनुषंगाने चिकनला मागणी वाढते, असा गेल्या वर्षीपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात ब्रॉयलर कोंबड्यांची मागणी पूर्ववत होऊ शकेल, असे उत्पादकांचे म्हणणे आहे. अगोदरच उत्पादनात ५० टक्क्यांनी घट होत असताना दुसरीकडे मागणी वाढल्यास उत्पादन खर्चापेक्षा पुन्हा चांगला भाव मिळेल, असे श्री. अहिरे यांनी म्हटले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Broiler prices rise despite while bird flu outbreak nashik marathi news