स्मशानभूमी हीच त्याची कर्मभूमी! काळजाला चटके देणारे स्मशानभूमीतील वातावरण पंकजकडून सुगंधीत 

smashan pimplegaon 1.jpg
smashan pimplegaon 1.jpg

पिंपळगाव बसवंत ( जि.नाशिक) : कोरोनामुळे अखेरचा श्‍वास घेतलेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीला जवळचे नातेवाइकही येऊ शकत नाहीत. अशी दहशत कोरोनाने जनमाणसात पसरविली आहे. मात्र अशा भीतीच्या वातावरणातही पिंपळगाव बसवंतच्या स्मशानभूमीत कर्तव्यावर असलेला पंकज इरावार निष्ठेने सेवा देतोय. जळणारी चिता व दु:खाचे घुमणारे हुदंके असे काळजाला चटके देणारे स्मशानभूमीतील वातावरण विजयादशमीला झेंडूच्या फुलांनी पंकजने सुगंधीत केले. 

 स्मशानभूमीतील वातावरण पंकजकडून सुगंधीत

दसरा हा हिंदू समाजात महत्त्वाचा सण. याच दिवशी सीमोल्लंघन करून नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी अनेकजण सज्ज होतात. या दिवशी घरोघरी उपजीविका ज्या साधनसामग्रीवर चालते, त्याचेही पूजन केले जाते. पिंपळगावमध्ये पंकज इरावार यांच्या कुटुंबाचे उपजीविकेचे साधन असलेल्या स्मशानभूमीत मृतदेहाचे सरण रचून अग्निडाग दिला जातो, त्या ठिकाणी विधिवत पूजा केली. मृतदेहाचे सरण रचण्याच्या कामाप्रति पंकजची एवढी निष्ठा आहे, की दसऱ्याच्या मुहूर्ताला त्याने चक्क स्मशानभूमीत पूजा केली. पंकज साहेबराव इरावार पुसद (जि. यवतमाळ) येथील आहे. मसणजोगी समाजात जन्मलेल्या पंकजचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. पण कुटुबांत अठराविश्‍व दारिद्रयामुळे समाजाचे परंपरागत काम त्याने स्वीकारले. 
तीन वर्षांपासून तो पिंपळगावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करत आहे. मृतदेह पूर्णपणे जळण्यासाठी सरण रचण्याच्या कौशल्यात तो निपुण आहे. पंकजच्या मदतीला त्याची पत्नी आरतीही येते.

कोरोना फायटर म्हणूनही ओळख

एरवी सरण रचणे हे त्याच्या अंगवळणी पडले. पण आता कोरोनाच्या कालावधीतही काम करत असल्याने तो कोरोना फायटर म्हणूनही ओळखला जात आहे. त्याच्या कामाची दखल घेत पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर, सोसायटीचे माजी अध्यक्ष सतीश मोरे, उमेश जैन यांनी पंकजचा वाढदिवस साजरा करत त्याच्या कार्याचे कौतुक केले. पिंपळगाव ग्रामपंचायतीकडून पंकजला महिन्याला सात हजार रुपये मानधन तर अंत्यसंस्कारांसाठी आलेले नागरिक कधीतरी १०० ते २०० रुपये देतात. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा
 
उदरनिर्वाह करताना कसरत 

नेहमी शोककळा असणाऱ्या पिंपळगावच्या स्मशानभूमीत दसऱ्याच्या दिवसाचे वातावरण प्रसन्न व झेंडूने सुवासित झाले होते. पंकजने आपट्याचे पान व झेंडू ठेवून पूजा केली. कामालाच राम मानणाऱ्या व कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या पंकजवर कौटुंबिक जबाबदारी आहे. अनिकेत व सोहम ही दोन मुले, तर पलक ही मुलगी आहे. त्यांच्या शिक्षणाबरोबरच उदरनिर्वाह करताना पंकजची कसरत होते. 

प्रत्येकाला आपली नोकरी, व्यवसाय प्रिय असतो. तशी मलाही स्मशानभूमी प्रिय आहे. म्हणून दर वर्षी दसरा-दिवाळीची पूजा स्मशानभूमीत करतो. मुलांना उच्च शिक्षण देण्याचे स्वप्न आहे. - पंकज इरावर, स्मशानभूमीतील कर्मचारी, पिंपळगाव बसवंत 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com