मालेगाव मनपाची कोरोनामुळे झालीय आर्थिक कोंडी...संकटातून तारणार का नवे आयुक्त?

malegaon-municipal-corporat-394x218.jpg
malegaon-municipal-corporat-394x218.jpg

नाशिक : (मालेगाव) कोरोनामुळे मालेगाव महापालिकेचे कंबरडे मोडलंय. आर्थिक वर्षातील महत्वाच्या मार्च महिन्यात विविध करांची शून्य वसुली झालीय. करापोटीची जुनी व नवीन अशी 70 ते 75 कोटीची वसुली आव्हानात्मक आहे. सध्या संकटातून बाहेर पडण्यालाच प्राधान्य दिले जात आहे. मालेगाव पूर्वपदावर येण्यास मोठा कालावधी लागू शकतो. मालेगाव महापालिका आयुक्त अमरावती येथील जिल्हा प्रशासन अधिकारी त्र्यंबक कासार यांच्या पुढे मोठे आव्हानच येऊन ठाकले आहे.

अंदाजपत्रकाचाही कोरोनामुळे बट्ट्याबोळ

आर्थिक वर्षात जेमतेम नऊ महिन्याच्या कालावधीत सन 2020-21 च्या 375 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकापर्यंत पोहचणे सध्या तरी अवघड दिसत आहे. महापालिकेची आधीच विस्कटलेली घडी कोरोनानंतर पूर्वपदावर आणण्याचे मोठे आव्हान नवीन आयुकांसह अधिकारी व पदाधिकाऱ्यापुढे असेल. मुळात आजवर झालेली सर्वच अंदाजपत्रके मोठ्या प्रमाणात तुटीची राहिली आहेत. सरत्या वर्षातील अंदाजपत्रकाचाही कोरोनामुळे बट्ट्याबोळ झाला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी ओळखून महापालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वीच मंजूर झालेली मात्र सुरू न झालेली कामे रद्द केली आहेत. आर्थिक वर्षात विकास कामांना फटका बसू शकतो. कोरोनामुळे अंदाजपत्रकाचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. विस्कटलेली आर्थिक परिस्थिती कशी बदलता येईल यावर अजून तरी विचारमंथन झालेले नाही. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यानंतर या बाबींचा विचार सुरू होईल.

जेमतेम नऊच महिने मिळतात

नवीन आर्थिक वर्षातील एप्रिल लॉकडाऊनमध्ये गेला आहे. कोरोना रुग्णांची संख्या द्वि शतकाच्या उबरठयावर आहे. त्यामुळे मे व जून हे दोन महिने परिस्थिती सावरण्यात जाऊ शकतील. उर्वरित नऊ महिन्यात कर वसुलीसह इतर कामांचे नियोजन करावे लागेल.

नवीन आयुक्तांपुढे आव्हान

महापालिकेचे नवीन आयुक्त त्र्यंबक कासार कालच रुजू झाले. कोरोना हद्दपार झाल्यानंतर त्यांना महापालिकेची आर्थिक घडी बसवावी लागेल. येथील आस्थापणा खर्च 40 ते 42 टक्के आहे. पगार, निवृत्ती वेतन व इतर आस्थापना खर्च वर्षाला शंभर कोटीच्या घरात जातो. महापालिकेवर असलेले कर्ज, देणी यांचाही ताळमेळ बसवावा लागेल.

मालेगावकरांच्या सवयीने बसला फटका

बहुतांशी नागरिकांना मालमत्ता कर तसेच बँकेचे थकीत व्याज मार्च महिन्यातच भरण्याची सवय आहे. कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यात काम ठप्प होते. त्यामुळे जेमतेम 52 टक्के वसुली झाली. जुनी व नवीन करांची 70 ते 75 कोटीची वसुली अपुऱ्या कर्मचाऱ्यांकडून करणे अवघड होणार आहे. 

महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर काम करीत आहेत. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर नवीन आयुक्त, महापौर आदींच्या मार्गदर्शनाखाली अंदाजपत्रक, कामे व कर वसुलीचे नियोजन केले जाईल. - कमरुद्दीन शेख, अकाऊंटंट, मानपा मालेगाव  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com