जोरदार पावसामुळे चणकापूर ९८ टक्के भरले! तर पिकांचे अतोनात नुकसान

रविंद्र पगार
Tuesday, 22 September 2020

खरीप पिके काढणीस तयार झाली आहेत. मात्र शनिवारी रात्रभर जोरदार अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले असून, सर्व पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. सर्वच पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, मोठे संकट उभे ठाकले आहे.

नाशिक/कळवण : तालुक्यातील चणकापूर धरण ९८ टक्के भरले असून, पूरपाणी गिरणा नदीपात्रात सोडले आहे. कळवण शहर व तालुक्यात शनिवारी (ता. १९) रात्री वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने मका, बाजरी, कांद्याची रोपे, नवीन लागवड झालेले कांद्याचे अतोनात नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत. 

खरीप पिके काढणीस तयार झाली आहेत. मात्र शनिवारी रात्रभर जोरदार अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले असून, सर्व पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. सर्वच पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, मोठे संकट उभे ठाकले आहे. प्रगतिशील शेतकरी अमोल मुर्तडक यांच्या मालकीच्या कळवण बुद्रुक गट क्रमांक ३६८ मधील १०० फूट विहिरीतील ६५ फूट रिंगा जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचल्यामुळे खचल्या. यामुळे पाच एचपीच्या इलेक्ट्रॉनिक मोटारीसह अंदाजे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले. शासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

हेही वाचा > अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

धरण परिसरात ४५ मिलिमीटर पाऊस

चणकापूर व पुनंद धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याची पातळी वाढली आहे. चणकापूर धरणात पाण्याचा साठा दोन हजार ३७१ दशलक्ष घनफूट झाला असून, ९८ टक्के भरले असून, सकाळी सकाळी गिरणा नदीमध्ये चणकापूरमधून पूरपाण्याचा ९०८ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. चणकापूर उजव्या कालव्याला १२० क्यूसेकने पाणी सुरू असून, धरण परिसरात रविवारी ४५ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. आतापर्यंत ७९७ मिलिमीटर पाऊस झाला असून, नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. 

हेही वाचा > आश्चर्यच! आठवड्यात गायीने दिला दोनदा जन्म; डॉक्टरांच्या गोठ्यातील किमया  

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chankapur dam 98 percent full nashik marathi news