बापाच्या मेहनतीला पूरक ठरणार लेकराचा "आविष्कार"...एकदा वाचाच

राजेंद्र दिघे : सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 July 2020

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये खऱ्या अर्थाने बळिराजा संकटात कणखर होता. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लागवडीच्या अनेक नव्या कल्पना नवे तंत्रज्ञान शोधत आहेत. पारंपारिक शेतीत नवे बदल घडत आहे. शेतकरी स्वतः कल्पक व चिकित्सक असल्याने नव्या तंत्रज्ञानात अपडेट असतात. मालेगावच्या मन्सूरा इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या लेकरांनी बापाच्या मेहनतीला पुरक ठरणारे 'बीजारोपण यंत्र' विकसित केले. कोरोनात आजही सर्वत्र 'मालेगाव पॅटर्नचा'गाजावाजा ठरणाऱ्या युनानी 'मन्सुरा' काढ्या नंतर या कॅम्पसच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला. 

नाशिक : (मालेगाव कॅम्प) मालेगावच्या मन्सुरा इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अर्थात शेतकऱ्यांच्या लेकरांनी बापाच्या मेहनतीला पूरक ठरणारे बीजारोपण यंत्र विकसित केले आहे. कोरोनात आजही सर्वत्र 'मालेगाव पॅटर्न'चा गाजावाजा ठरणाऱ्या युनानी 'मन्सुरा' काढ्यानंतर या कॅम्पसच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

बैलाशिवाय काम होण्यावर भर 

या यंत्राने बियाणे आवश्यकतेच्या ओळीवर रोप लावण्यासह रोपामध्ये अंतर ठेवते. पेरलेले बियाणे मातीने झाकण्याचे काम करते. बियाण्यावर योग्य प्रमाणात माती यंत्राच्या माध्यमातून दाबली जाते. दोन ओळींतील बियाण्याचे अंतर निर्धारित होते. बियाणे लागवडीची खोली एकसारखी राहते. परिणामी उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. वेगवेगळ्या वातावरणात हे यंत्र काम करू शकते. उच्चतम उत्पादन मिळण्यासाठी पारंपरिक पेरणीची पद्धती प्रभावी ठरत आहे. या यंत्रामुळे हे कार्य सरस ठरण्याची अपेक्षा संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 

एका दिवसात यंत्र तयार

शेतकऱ्यांना अल्प खर्चात शेतीची कामे करता यावीत यासाठी मौलाना मुख्तार नदवी टेक्निकल कॅम्पसमध्ये मन्सुरा अभियांत्रिकीचे प्रा. फैसल अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक पाटील, तुषार देशमुख, गौरव सावळे, निखिल बोरसे, आकाश पाटील यांनी डिझाइन ॲन्ड फॅब्रिकेशन ऑफ सीड सोइंग मशिन विकसित केले. यंत्राचा सोप्या पद्धतीने वापर करून बीजारोपण शक्य आहे. चार हजार रुपयांत एका दिवसात यंत्र निर्माण केले. यात दोन चाके, लोखंडी साखळी, पत्र्याचे पॉकेट, गिअर ट्रेन, नांगर फाळ, प्लॅस्टिक नळी, लोखंडी फावडे या साहित्याचा वापर केला आहे. 

हेही वाचा > हायटेक सल्ला पडला महागात; दोन एकरांतील ऊस जळून खाक...नेमके काय घडले?

या अप्रतिम 'शेती मित्र यंत्र' निर्मितीचे संस्थेचे अध्यक्ष अर्शद मुख्तार, सचिव रशीद मुख्तार, प्राचार्य डॉ. ए. के. कुरेशी, उपप्राचार्य मोहम्मद रमजान यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. बीजारोपण यंत्राच्या पेटंटला परवानगी मिळविण्यासाठी संस्था कृषी विभागाकडे प्रयत्न करणार आहे.  

हेही वाचा > आयुक्तांची रात्री उशिरा रुग्णालयात एंट्री...चौकशीत मोठा खुलासा...नेमके काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cheap sowing Machine made by farmer's children nashik marathi news