chicken shop different prices.jpg
chicken shop different prices.jpg

नदी के उस पार 130, नदी के इस पार 180...चिकन दराची वेगळीच गंमत!

नाशिक : (मालेगाव) शहरातील मुस्लिमबहुल असलेल्या पूर्व भागात चिकनचा दर 130 रुपये किलो आहे. हाच दर कॅम्प, संगमेश्‍वरच्या पश्‍चिम भागात 180 रुपये आहे. एकाच शहरात असणाऱ्या दोन भागांमध्ये किलोमागे तब्बल 50 रुपयांचा फरक आहे.      फरकामुळे पश्‍चिम भागातील अनेक खवय्ये पूर्व भागातून चिकन खरेदीला प्राधान्य देत आहेत. दरम्यान बोकडाचे मटण व गावठी कोंबडीचे भाव वाढल्याने ब्रॉयलर चिकनला मोठी मागणी आहे.

गावठी कोंबडी व बोकडाचे मटण अनेकांना परवडत नाही

शहरातील मुस्लिमबहुल असलेल्या पूर्व भागात मजुरांची संख्या लक्षणीय आहे. या भागात शंभरावर झोपडपट्ट्या आहेत. टुमदार घरे व बंगल्यांच्या तुलनेने झोपडपट्टीत राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पश्‍चिम पट्ट्यातील कॅम्प, संगमेश्‍वर, सोयगाव,  सटाणा नाका, कलेक्‍टरपट्टा आदी भागात घरे व टुमदार बंगले सर्वाधिक आहेत. या भागातही 25 पेक्षा अधिक झोपडपट्ट्या आहेत. पूर्व भागात मांसाहार विक्रीची दुकाने जागोजागी दिसतात. सध्या बोकडाचे मटण 520 रुपये किलो, तर गावठी कोंबडीचा दर किलोला पाचशे रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे गावठी कोंबडी व बोकडाचे मटण अनेकांना परवडत नाही. परिणामी, खवय्यांनी ब्रॉयलर चिकनकडे मोर्चा वळविला आहे. विविध पोल्ट्री कंपन्यांकडून ब्रॉयलर कोंबडीचा पुरवठा किरकोळ व्यापाऱ्यांना केला जातो. 
वजनावर या कोंबड्या दिल्या जातात. ब्रॉयलर कोंबड्यांचा (जिवंत) भाव 80 रुपये किलोप्रमाणे आहे. 

कमी-जास्त विक्रीमुळे भावात तफावत?

पूर्व भागात कोंबडीच्या कातडीसह चिकनचा भाव 120 रुपये किलो आहे. अनेक जण घरी जाऊन कातडी काढून घेतात. कातडी काढलेले चिकन 130 रुपये किलोने मिळत आहे. पश्‍चिम भागात मात्र चिकनचा दर 170 ते 180 रुपये आहे. पूर्व भागात विक्री अधिक होते. त्यामुळे कमी नफ्यातही परवडते. याउलट पश्‍चिम भागात चिकनची कमी विक्री होते. त्यामुळे वाढीव दर घेऊनच हा व्यवसाय परवडतो, असे विक्रेत्यांचे मत आहे. पूर्व व पश्‍चिम भागात चिकन विक्रीचे प्रमाण 75 व 25 टक्के अशा प्रमाणात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

परवडेल, असा भाव ठेवल्यास व्यवसाय अधिक

पोल्ट्री कंपनीकडून घरपोच माल मिळतो. चिकनला चांगली मागणी आहे. चिकन विक्रीची शेकडो दुकाने आहेत. स्पर्धा असल्याने कमी नफ्यात मालाची विक्री करतो. 
मजूर, कामगार मोठ्या प्रमाणावर चिकन खरेदी करतात. त्यांनाही परवडेल, असा भाव ठेवल्यास व्यवसाय अधिक होतो.-शाकीर अन्सारी, बाबा चिकन सेंटर, मालेगाव  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com