चुंभळे कुटुंब राष्ट्रवादीच्या वाटेवर? शिवसेनेत घुसमट; अजिंक्य चुंभळेंची समीर भुजबळांशी भेट

प्रमोद दंडगव्हाळ
Wednesday, 9 September 2020

काही दिवसांपासून चुंभळे कुटुंबीयांची शिवसेनेमध्ये घुसमट होत असल्याचे विविध कारणांवरून दिसत आहे. बाजार समितीचे सभापतिपद शिवाजी चुंभळे यांच्याकडे होते. ते वाचविण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकाच्या हालचाली झाल्या नाहीत. पर्यायाने शिवाजी चुंभळे यांना सभापतिपदाला मुकावे लागले.

नाशिक / सिडको : पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई येथील रामटेक बंगल्यावर मंगळवारी (ता. ८) गौळाणेचे शिवसेनेचे सरपंच व बाजार समिती माजी सभापती शिवाजी चुंभळे यांचे पुत्र अजिंक्य चुंभळे यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याचे तपशील मिळाले नसले तरी राज्यात सत्तेत असूनही शिवसेनेकडून कोणत्याच प्रकारची मदत मिळत नसल्याची भावना बळावल्याने नाराज चुंभळे कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. 

चुंभळे कुटुंबीयांची शिवसेनेमध्ये घुसमट?
काही दिवसांपासून चुंभळे कुटुंबीयांची शिवसेनेमध्ये घुसमट होत असल्याचे विविध कारणांवरून दिसत आहे. बाजार समितीचे सभापतिपद शिवाजी चुंभळे यांच्याकडे होते. ते वाचविण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकाच्या हालचाली झाल्या नाहीत. पर्यायाने शिवाजी चुंभळे यांना सभापतिपदाला मुकावे लागले. नगरसेविका कल्पना चुंभळे यांनी प्रभागामध्ये विविध विकासकामांच्या फायली महापालिकेत देऊनही त्यांचे काम मार्गी लावण्यासाठी शिवसेनेची मदत होत नसल्याने कल्पना चुंभळेदेखील नाराज आहेत. त्यांना समित्यांवर अद्यापपर्यंत एकही पद मिळालेले नाही. गौळाणे ग्रामपंचायतीचे विकासकामे अद्यापपर्यंत मार्गी लागलेले नाही. चुंभळे यांनी स्वतःच्या हिमतीवर गोवर्धन गटातील जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले. त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे राज्यात सत्ता असतानाही, तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानाही कामे होत नसतील तर मग शिवसेनेत राहून काय उपयोग, अशी भावना चुंभळे कुटुंबीयांमध्ये निर्माण झाली आहे.

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

राजकीय दृष्टिकोनातून बघू नये,

या सर्वांचा सारासार विचार करता मंगळवारी मुंबई येथील पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक निवासस्थानी माजी खासदार समीर भुजबळ यांची अजिंक्य चुंभळे यांची भेट झाल्याने चुंभळे कुटुंब राष्ट्रवादीच्या वाटेवर चालले की काय, अशा चर्चेला उधाण आले. यासंदर्भात अजिंक्य चुंभळे यांना विचारणा केली असता, त्यांनी ही सदिच्छा भेट असून याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघू नये, असे स्पष्टीकरण दिले. 

हेही वाचा > धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा

दोन दिवसांपूर्वी माझा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मी भुजबळ कुटुंबीयांचे आशीर्वाद घेण्यासाठी रामटेक बंगल्यावर गेलो होतो. यामागे कुठल्याही प्रकारचे राजकारण समजू नये. -अजिंक्य चुंभळे, सरपंच, गौळाणे, नाशिक  
 

 संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chumbhale family will enter in NCP nashik marathi news