कोरोना टेस्टिंग लॅबकडे यंत्रणेचे दुर्लक्ष का?...संतप्त नाशिककरांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

लॅब अखंडित सुरू राहण्याऐवजी तिच्या कामकाजाविषयी दिशाभूल करण्याचे पद्धतशीर सत्र राबविण्यात येत असल्याने नाशिककरांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. कोरोना टेस्टिंग लॅब मिळविण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रयत्न केले असताना, लॅबकडे यंत्रणेचे दुर्लक्ष का होते? असा गंभीर प्रश्‍न नाशिककरांना भेडसावू लागला आहे.

नाशिक : लॅब अखंडित सुरू राहण्याऐवजी तिच्या कामकाजाविषयी दिशाभूल करण्याचे पद्धतशीर सत्र राबविण्यात येत असल्याने नाशिककरांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. कोरोना टेस्टिंग लॅब मिळविण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रयत्न केले असताना, लॅबकडे यंत्रणेचे दुर्लक्ष का होते? असा गंभीर प्रश्‍न नाशिककरांना भेडसावू लागला आहे. साहित्य मिळत नसल्याने लॅब बंद पाडल्याचा पाढा श्री. भुजबळांकडे राष्ट्रवादीच्या आमदारांनी वाचला. 

दिशाभुलीमुळे वाढली अस्वस्थता 

लॅबची साडेसाती संपवा, अशी साद शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये घातली. त्यानंतर श्री. भुजबळांच्या बैठकीत आमदार लॅबचे गाऱ्हाणे मांडत होते. त्या वेळी मॅन्युअलीचा मुद्दा उपस्थित झाल्यावर ऑटोमेशनची व्यवस्था करा, असा सूर आमदारांनी लावला. हे एकीकडे होत असताना, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी लॅब बंद पाडण्यामागे नेमके कोणते षडयंत्र चालले आहे, याची माहिती जाणून घेतली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॅबसाठी साहित्य कमी पडू देणार नाही, असा शब्द देऊनही वेळेत साहित्य का उपलब्ध होत नाही इथपासून ते नाशिकसाठी कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने आलेल्या निधीतून इतर जिल्ह्यासाठी काही साहित्य गेले आहे काय, याची माहिती नाशिककरांनी घेण्यास सुरवात केली आहे. 

कागदी घोडे नाचविण्याचा चाललाय खेळ 

"सीटू'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संवाद साधून लॅब पूर्ण क्षमतेने चालविण्याची विनंती केली. लॅबसाठी वेळोवेळी नव्हे, तर आगाऊ एक ते दोन महिन्यांचे साहित्य दिले पाहिजे, त्यात काही अडचण आहे काय, अशी विचारणा डॉ. कराड यांनी केली. एकूणच ही सारी परिस्थिती पाहता, लॅब बंद पाडण्यासाठी रचल्या गेलेल्या पद्धतशीर खेळाविरोधात नाशिककर संताप व्यक्त करण्याच्या मनःस्थितीत आहेत. मुळातच, यंत्रणांकडून कागदी घोडे नाचविण्याचा खेळ सुरू आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मध्यंतरी लॅबची जबाबदारी कुणावर सोपवली आणि कुणाचे नियंत्रण असेल, याची माहिती दिली होती. तरीही लॅबसाठी साहित्य वेळेवर मिळत नाही म्हटल्यावर कुणाविरुद्ध कारवाई केली जाणार? याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा > 'भूक कशी लॉकडाउन करणार?'...शेवटी 'त्यांनी' रिक्षाचे टायर विकून भागला घरखर्च!

आठवडाभराच्या पोचलेल्या साहित्यावर वेळ मारून नेण्याची संधी 

लॅबसाठी आठवडाभराचे साहित्य पोचल्याने लॅब बंद पडण्याविषयी नाशिककरांमध्ये वाढलेल्या रोषापुढे वेळ मारून नेण्याची संधी यंत्रणेला मिळाली आहे. लॅब विनाअडथळा सुरू न ठेवण्याचा अर्थ एव्हाना नाशिककरांच्या ध्यानात आला आहे. त्यात बदल न झाल्यास आगामी काळात यंत्रणा म्हणून भुई धोपटण्यापेक्षा थेट नाव घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पाढा वाचला जाण्याची शक्‍यता आहे.  

हेही वाचा > नाशिक ग्रामीण पोलीस दलातील तिसरा कोरोनाचा बळी..इथेही मालेगाव कनेक्शन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaints made by Nashik residents at the state level regarding the negligence of Corona Testing Lab nashik marathi news