उद्‌घाटनाआधीच तुटले प्रवेशद्वार; नामपूरच्या तालुका क्रीडासंकुलाची अवस्था कचराकुंडीसारखी 

nampur sport complex
nampur sport complex

नामपूर (नाशिक) : ग्रामीण भागातील खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्चून येथील मोराणे रस्त्यालगत बांधलेल्या तालुका क्रीडासंकुलाच्या उद्‌घाटनाचा चार वर्षांपासून शासनाला विसर पडला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, क्रीडा विभागाचे अधिकारी यांनी याकामी लक्ष घालून तातडीने क्रीडासंकुल कार्यान्वित करावे, अशी मागणी युवा खेळाडूंकडून होत आहे. 

उद्‍घाटनाआधीच तुटलेले प्रवेशद्वार, क्रीडासंकुलात झालेला कचऱ्याचा ढीग, तळीरामांचा अड्डा, साहित्याची झालेली मोडतोड यामुळे तालुका क्रीडासंकुलाची अवस्था अक्षरश: कचराकुंडीसारखी झाली आहे. क्रीडासंकुलाच्या भूमिपूजनापासून सुरू झालेली श्रेयवादाची साडेसाती अद्याप नामपूरकरांचा पिच्छा सोडत नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दोनदा भूमिपूजन तरी ४ वर्षांपासून उद्‌घाटनाला मुहूर्त नाही

राज्यात शहरी व ग्रामीण भागात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्रिस्तरीय क्रीडासंकुलांची उभारणी करण्याचे धोरण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष असलेल्या आघाडी सरकारचे होते. यात विभागीय, जिल्हा व तालुकास्तरीय क्रीडासंकुलांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील होतकरू मुलांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या धोरणामागचा उद्देश आहे. त्यानुसार ‘तालुका तिथे क्रीडासंकुल’ असे क्रीडा विभागाने धोरण आखले होते. 
त्यानुसार सटाणा शहरासाठी तालुकास्तरीय क्रीडासंकुल मंजूर झाले परंतु सटाणा शहरात क्रीडासंकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध न झाल्याने तत्कालीन आमदार उमाजी बोरसे यांनी माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सटाणा येथील क्रीडासंकुल नामपूर शहरात आणले. त्यासाठी नामपूर ग्रामपंचायतीने मोराणे रस्त्यालगत सुमारे दोन एकर जागा उपलब्ध करून दिली. १५ ऑगस्ट २०१४ ला कामाचे भूमिपूजन माजी आमदार उमाजी बोरसे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सत्तांतर होऊन राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण आमदारपदी विराजमान झाल्या. एक वर्षानंतर पुन्हा या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्याने भाजप व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गदारोळ निर्माण झाला होता. दोन वेळा भूमिपूजन होऊनही चार वर्षांपासून क्रीडासंकुलाच्या उद्‌घाटनाला मुहूर्त सापडत नसल्याने क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून तातडीने क्रीडासंकुल कार्यान्वित करावे, अशी मागणी युवा खेळाडू करत आहेत.

आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे खेळापासून दूर जात आहे. त्यामुळे क्रीडासंकुल ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी वरदान आहे. येथील भग्नावस्थेत असलेल्या क्रीडासंकुलामुळे मन विषण्ण होते. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी पुढाकार घेऊन क्रीडासंकुल सुरू करावे. 
-साहेबराव अहिरे, युवा खेळाडू, नामपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com