विनाअनुदानित इन्स्टिट्यूट अडचणीत : बंद वर्गामुळे फी नाही.. शिष्‍यवृत्‍तीच्या रक्कम अडकल्‍या.

study.jpg
study.jpg

नाशिक : कोरोना विषाणूमुळे गेल्या मार्चपासून शाळा, महाविद्यालयांचे कामकाज अद्यापपर्यंत बंद आहे. अशा परिस्थितीत विनाअनुदानित तत्त्वावरील व्यावसायिक महाविद्यालयांची आर्थिक कोंडी होऊ लागली असून, कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अन्य विविध बाबी अडचणीच्या ठरत आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडे शिष्यवृत्तीपोटी असलेली थकीत रक्‍कम तातडीने अदा करताना इन्स्टिट्यूटला बळ द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. 


विनाअनुदानित महाविद्यालयांना हवे शासकीय बळ  

विनाअनुदानित महाविद्यालयांना नियमित व्यवस्थापनासाठीचा बहुतांश खर्च शैक्षणिक शुल्कातून उभारला जात असतो. यात प्रामुख्याने अध्ययनासाठी लागणारे साहित्य, प्राध्यापक-शिक्षकांच्या वेतनासह अन्य विविध बाबींचा समावेश असतो. परंतु कोविड-19 मुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीत अनपेक्षितपणे मार्चअखेरीपासून महाविद्यालय बंद करायची वेळ ओढावली होती. तत्पूर्वी बऱ्याच विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्कापोटी रक्‍कम थकीत होती. परिस्थितीत सुधारणा होत नसताना जोखीम टाळण्यासाठी शासनस्तरावर महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परीक्षांपूर्वी महाविद्यालयांकडून थकीत शैक्षणिक शुल्क वसूल केले जात असताना सध्याच्या परिस्थितीत ते शक्‍य होऊ शकले नाही. असे असताना विद्यार्थ्यांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणात शैक्षणिक शुल्क थकलेले आहे. याशिवाय शासनाकडून शिष्यवृत्तीपोटी मिळणारी रक्‍कमही थकीत असल्याने महाविद्यालयांना दुहेरी मार बसला आहे. 

शासनाकडून थकीत शिष्यवृत्तीपोटी रक्‍कम उपलब्ध करण्याची मागणी 
काही महाविद्यालयांना गत शैक्षणिक वर्षाकरिता शिष्यवृत्तीची रक्‍कम शासनाकडे प्रलंबित आहे. आर्थिक स्रोतांना मर्यादा आल्याने विनाअनुदानित महाविद्यालये कोंडीत सापडलेली आहेत. संस्था पातळीवर अशा महाविद्यालयांना आधार दिला जात असला, तरी शासनाकडून आवश्‍यक ते पाठबळ मिळण्याची आवश्‍यकता व्यक्‍त केली जात आहे. 

व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या मोठी 
विनाअनुदानित तत्त्वावरील व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांची संख्या लक्षणीय आहे. यात प्रामुख्याने अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयांसह अन्य विविध शाखांच्या महाविद्यालयांचा समावेश आहे. 

...तर अर्थचक्र सुरळीत होण्यास मदत होईल.
गेल्या मार्चपासून कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सर्व शैक्षणिक संस्थांचे अर्थकारण ठप्प झाले आहे. अद्यापही नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेबाबत स्पष्टता नाही. या अडचणीतून सावरण्याचा प्रभावी उपाय म्हणजे शासनाने त्यांच्याकडे थकीत असलेला शिष्यवृत्तीचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा. यातून विनाअनुदानित महाविद्यालयांचे अर्थचक्र सुरळीत होण्यास मदत होईल. -प्रा. डॉ. प्रशांत सूर्यवंशी, 
केबीएच आयएमआर एमबीए महाविद्यालय, मालेगाव 


एकीकडे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक शुल्क प्रलंबित असताना दुसरीकडे शिष्यवृत्तीपोटी मोठी रक्‍कम शासनाकडे थकीत आहे. अशा परिस्थितीत ज्ञानदानाचे काम करणाऱ्या महाविद्यालयांना जगविण्याची जबाबदारी शासन व पालकांनी निभावली पाहिजे. ज्यांची क्षमता आहे, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी थकीत शुल्क अदा करावे. शासनानेही शिष्यवृत्तीपोटी शिल्लक असलेली रक्‍कम महाविद्यालयांना उपलब्ध केली पाहिजे. 
-प्राचार्य डॉ. सी. के. पाटील, ब्रह्मा व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालय  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com