जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्येने ७० हजारांचा टप्पा ओलांडला; दिवसभरात १ हजार ४६८ नवे बाधित

अरुण मलाणी
Friday, 25 September 2020

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्‍याने रूग्‍णसंख्येचा डबलींग रेट अर्थात्‌ रूग्‍ण दुप्पट होण्याचा दर सोळा ते अठरा दिवसांचा होता. पंचवीस हजार रूग्‍णांहून पन्नास हजाराचा टप्पा गाठण्यासाठी पंचवीस दिवसांचा कालावधी लागला होता.

नाशिक : जिल्ह्यात आढळलेल्‍या कोरोना बाधितांच्‍या संख्येने सत्तर हजारांचा आकडा ओलांडला आहे. शुक्रवारी (ता. २५) दिवसभरात १ हजार ४६८ कोरोना बाधित आढळून आल्‍याने एकूण बाधितांची संख्या ७० हजार २९७ झाली. यापैकी ६१ हजार ३३९ रूग्‍णांनी कोरोनावर मात केलेली आहे. दरम्‍यान, रूग्‍णसंख्येचा डबलींग रेट आता सत्तावीस दिवसांचा झालेला आहे. 

डबलिंग रेट २७ दिवसांचा

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्‍याने रूग्‍णसंख्येचा डबलींग रेट अर्थात्‌ रूग्‍ण दुप्पट होण्याचा दर सोळा ते अठरा दिवसांचा होता. पंचवीस हजार रूग्‍णांहून पन्नास हजाराचा टप्पा गाठण्यासाठी पंचवीस दिवसांचा कालावधी लागला. तर गेल्‍या २९ ऑगस्‍टला ३५ हजार रूग्‍ण असताना सत्तर हजारांवर रूग्‍ण पोचण्यासाठी २७ दिवस लागल्‍याने सद्यस्‍थितीत जिल्ह्यातील रूग्‍णसंख्येचा डबलिंग रेट २७ दिवसांचा झालेला आहे. दरम्‍यान, शुक्रवारी आढळलेल्‍या नवीन बाधितांमध्ये नाशिक शहरातील १ हजार ०५७, नाशिक ग्रामीणचे ३७५, मालेगावचे २७, तर जिल्‍हाबाह्य नऊ रूग्‍ण आहेत. बरे झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ५४०, नाशिक ग्रामीणचे ४४१, मालेगाव ४१ तर जिल्‍हाबाह्य तेरा रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. 

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

दिवसभरात आढळलेल्‍या संशयितांची संख्या लक्षणीय राहिली. नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २ हजार ४८९, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १६०, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २४, डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सात आणि जिल्‍हा रूग्‍णालयात १२ संशयित दाखल झाले आहेत. 

दिवसभरात २६ मृत्‍यू 

गेल्‍या काही दिवसांत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंचे प्रमाण वाढलेले आहे. शुक्रवारी २६ बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यात नाशिक शहरातील १५, तर नाशिक ग्रामीणमधील ११ रूग्‍णांचा समावेश आहे. यापूर्वी गुरूवारी (ता. २४) दिवसभरात २४, बुधवारी २०, मंगळवारी १५, सोमवारी १७ रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार २७५ रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. यापैकी नाशिक शहरातील ६९४, नाशिक ग्रामीणचे ४०२, मालेगाव महापालिका हद्दीतील १५१ आणि २८ जिल्‍हाबाह्य रूग्‍ण आहेत. 

मालेगावला २७ ला, तर देवळ्यात १९ पॉझिटिव्ह 

मालेगाव/देवळा : शुक्रवारी मालेगाव शहरात नव्याने २७, तर देवळा तालुक्यात १९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. तर, द्याने (मालेगाव) येथील ६० वर्षीय संशयित महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मालेगावला नव्याने २४ रुग्ण दाखल झाले. सध्या ५५९ रूग्णांवर उपचार सुरू असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ हजार ९१४ म्हणजेच ८१.१२ टक्के आहे. तर, देवळ्यातील १९ रूग्णांमध्ये देवळा शहरातील १२, लोहणेर येथील दोन, गुंजाळवाडीतील ३, तर मकरंदवाडी, उमराणे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

 

संपादन- रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patient count crossed 70 thousand mark in nashik marathi news