जिल्ह्यात पन्नास हजारांचा टप्पा पार; डबलिंग रेट पंचवीस दिवसांचा

अरुण मलाणी
Saturday, 12 September 2020

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ११) नव्‍याने एक हजार ५५१ कोरोनाबाधित आढळून आले असून, एका दिवसात आढळलेल्‍या रुग्‍णांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यातून जिल्ह्यातील एकूण बाधितांच्‍या संख्येने पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ११) नव्‍याने एक हजार ५५१ कोरोनाबाधित आढळून आले असून, एका दिवसात आढळलेल्‍या रुग्‍णांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यातून जिल्ह्यातील एकूण बाधितांच्‍या संख्येने पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

डबलिंग रेट पंचवीस दिवसांचा

आतापर्यंत ५० हजार ७६० बाधित आढळून आले आहेत. यापैकी ३९ हजार ७९८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार ३५ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, सद्यःस्‍थितीत नऊ हजार ९२७ रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. दरम्‍यान, गेल्‍या १७ ऑगस्‍टला पंचवीस हजार रुग्‍णसंख्या होती. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्‍णांचा डबलिंग रेट पंचवीस दिवसांचा झाला आहे. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

ओलांडला पन्नास हजारांचा टप्पा 
सुरवातीच्‍या काही दिवसांत रुग्‍णसंख्या दुप्पट होण्याचा दर अर्थात डबलिंग रेट सोळा ते अठरा दिवसांचा होता. गेल्‍या १७ ऑगस्‍टला जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २५ हजार २८८ झाली होती. त्यानंतर पंचवीस दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी (ता. ११) ही रुग्‍णसंख्या ५० हजार ७६० वर पोचली आहे. दरम्‍यान, शुक्रवारी नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील एक हजार ८१, नाशिक ग्रामीणचे ४३७, मालेगावचे ३१ आणि जिल्‍हाबाह्य दोन रुग्ण आहेत.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

बरे झाले ३९ हजार ७९८

बरे झालेल्‍या एक हजार १३० रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ८१७, नाशिक ग्रामीणचे २६० रुग्‍ण असून, मालेगावच्‍या ५३ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. पंधरा मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील आठ, नाशिक ग्रामीणचे पाच, तर मालेगावच्‍या दोघा बाधितांचा समावेश आहे. दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ४७१, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २७९, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २०, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात २९, जिल्‍हा रुग्‍णालयात तीन संशयित दाखल झाले आहेत. 
 

महिनानिहाय आढळलेले रुग्ण 
महिना कोरोनाबाधित 
एप्रिल २८१ 
मे ९४३ 
जून ३,०४६ 
जुलै १०,१८९ 
ऑगस्‍ट २२,९२७ 
११ सप्‍टेंबरपर्यंत ५०,७६० 

रुग्‍णसंख्या वाढीचे टप्पे 
तारीख रुग्‍णसंख्या 
२६ मे ---------- एक हजार 
१५ जून --------- दोन हजार ६८ 
४ जुलै ---------- पाच हजार ११२ 
२१ जुलै -------- दहा हजार २५ 
१ ऑगस्‍ट ------- १५ हजार ५७ 
१० ऑगस्‍ट -------- २० हजार ५११ 
१७ ऑगस्‍ट -------- २५ हजार २८८ 
२३ ऑगस्‍ट ------- ३० हजार नऊ 
२९ ऑगस्‍ट -------- ३५ हजार ३२० 
३ सप्‍टेंबर --------- ४० हजार ४५३ 
८ सप्‍टेंबर --------- ४६ हजार ३२५ 
११ सप्‍टेंबर -------- ५० हजार ७६०  
 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient in district Fifty thousand stage crossed nashik marathi news