५६ मुलींचा 'तो' दत्तक पिता! सामाजिक दायित्वाचा पायंडा कायम; राजकारणी लोकांसाठी ठरतोय आदर्श

दत्ता जाधव  
Wednesday, 9 September 2020

दत्तक मुलींचा पालनकर्ता म्हणूनही 'त्यांनी' नवीन ओळख निर्माण केली आहे. काही वर्षांपूर्वी वाढदिवसावर खर्च करण्यापेक्षा काही सामाजिक कार्य करता येईल का, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील एकेरी पालक असलेल्या मुलींना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. कोण आहेत ते..

नाशिक : दत्तक मुलींचा पालनकर्ता म्हणूनही 'त्यांनी' नवीन ओळख निर्माण केली आहे. काही वर्षांपूर्वी वाढदिवसावर खर्च करण्यापेक्षा काही सामाजिक कार्य करता येईल का, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील एकेरी पालक असलेल्या मुलींना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. कोण आहेत ते..

आतापर्यंत ५६ मुलींना घेतले दत्तक

राजकारणी व्यक्तीचा वाढदिवस म्हटले, की होर्डिंगबाजी, कार्यकर्त्यांचा जल्लोष असतोच. परंतु महापालिकेचे विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे नगरसेवक अजय बोरस्ते यांनी या प्रकारांना फाटा देऊन त्यांच्या वाढदिवशी तीन मुली दत्तक घेऊन सामाजिक दायित्वाचा पायंडा कायम ठेवला आहे. आतापर्यंत ५६ मुलींना दत्तक घेत त्यांचे शिक्षण, आरोग्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. बुधवारी (ता. ९) वाढदिवशीही त्यांनी तीन मुलींना दत्तक घेत समाजकार्याचा पायंडा निरंतर ठेवला आहे. त्यांचे कार्य इतर राजकारणी लोकांसाठी आदर्श ठरत आहे. 

नगरसेवक अजय बोरस्ते यांच्याकडून शिक्षण, आरोग्याची जबाबदारी 
नगरसेवक अजय बोरस्ते यांचे नाव नाशिक शहराला आता नवीन नाही. उत्तम राजकारणी म्हणून त्यांना नाशिककर ओळखतातच. त्याव्यतिरिक्त दत्तक मुलींचा पालनकर्ता म्हणूनही त्यांनी नवीन ओळख निर्माण केली आहे. काही वर्षांपूर्वी वाढदिवसावर खर्च करण्यापेक्षा काही सामाजिक कार्य करता येईल का, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील एकेरी पालक असलेल्या मुलींना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलीच्या नावाने ‘रक्षा प्रकल्प’ त्यांनी सुरू केला. त्याअंतर्गत झोपडपट्टी भागातील ५६ मुलींना त्यांनी दत्तक घेऊन वाढदिवस साजरा करण्यास सुरवात केली. दत्तक घेतलेल्या सर्व मुली एकाच वयोगटातील होत्या. त्यांचे शिक्षण, आरोग्य, शिक्षणाबरोबरच कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष मोहीम राबविली. दत्तक घेतलेल्या मुली उत्तम शिक्षण घेऊन समाजात आत्मनिर्भरतेने वावरत आहेत. काही मुली महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत, तर काहींची लग्नेदेखील झाली आहेत. त्यांचे कन्यादान बोरस्ते यांनी केले आहे. 

होर्डिंग न लावण्याचा निर्धार 
होर्डिंगमुळे नाशिक शहरातील चौकाचौकांचा श्‍वास कोंडत असल्याने श्री. बोरस्ते यांनी एक नगरसेवक व त्याआधी एक नाशिककर म्हणून पुढाकार घेऊन होर्डिंग न लावण्याची प्रबोधनात्मक चळवळ सुरू केली. नाशिककरांनी त्यास मोठा प्रतिसादही दिला. मीदेखील कधीही वाढदिवसानिमित्त होर्डिंग लावणार नाही, असा निश्चय श्री. बोरस्ते यांनी केला. 

नगरसेवक ते दत्तक पिता 
-विद्यार्थी चळवळीतून २००२ मध्ये नगरसेवक 
-केटीएचएम कॉलेजसमोर शहरातील पहिला उड्डाणपूल 
-सीबीएस येथे भुयारी मार्ग 
-पोलिस वसाहतीत अभ्यासिका निर्मिती 
-महिला दहीहंडीच्या माध्यमातून नाशिकला नवी ओळख 
-युवा महोत्सव, करिअर फेअर, पतंग महोत्सवातून युवा वर्गाला प्रोत्साहन 
-बालगणेश फाउंडेशनच्या माध्यमातून अभ्यासिका, वाचनालय, आजी-आजोबा मंच, योगा वर्ग 
-गोदावरीची स्वच्छता, निर्माल्य, विसर्जनाचे उपक्रम  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corpoprator ajay boraste Adopted 56 girls nashik marathi news