ऑक्सिजन-औषध काळा बाजार आढळल्यास गुन्हे - जिल्हाधिकारी

विनोद बेदरकर
Friday, 25 September 2020

कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. औषध पुरविणाऱ्या स्टॉकिस्टकडेही वारंवार तपासणी करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त (औषधे) माधुरी पवार यांना सूचना दिल्या.

नाशिक : जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि औषधाच्या पुरवठ्याच्या तक्रारी असून, काळा बाजार होत असल्यास त्वरित गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी ही माहिती दिली. 

जिल्हाधिकारी - ऑक्सिजन, औषधाचा पुरवठा आढावा बैठक 
ऑक्सिजन व औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या लघु कृती गटाची बुधवारी (ता. २३) बैठक झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी वसंती माळी, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक निखिल सैंदाणे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश भामरे, अन्न व औषध प्रशासनाच्या जयश्री पवार आदी उपस्थित होते. 

सध्या पुरेसा ऑक्सिजन पुरवठा सुरू
बैठकीत डॉ. सैंदाणे यांनी, जिल्ह्यात कोरोनाबाधितांसाठी रोज तीन हजार ८०१ ऑक्सिजनची जम्बो सिलिंडरची मागणी असून, जिल्ह्यातील आजचा पुरवठा हा पाच हजार ५७१ जम्बो सिलिंडर इतका आहे. त्याविषयीची माहिती महापालिका-पालिकांकडून संकलित केली जात असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील रुग्णालयांना सध्या पुरेसा ऑक्सिजन पुरवठा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोणीही ऑक्सिजनची साठेबाजी करणार नाही आणि सर्व रुग्णालयांना पुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी पथक नेमून तपासण्या करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यंनी दिल्या. 

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

जेथे औषधाचा काळा बाजार तेथे गुन्हे दाखल

कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. औषध पुरविणाऱ्या स्टॉकिस्टकडेही वारंवार तपासणी करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त (औषधे) माधुरी पवार यांना सूचना दिल्या. त्यांच्या मदतीसाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती आली आहे. त्यांना वाहनदेखील पुरविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जेथे औषधाचा काळा बाजार आढळेल तेथे गुन्हे दाखल करण्याबाबत सूचना दिल्या.  

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crimes if the oxygen drug black market is found nashik marathi news